मुंबई Ladki Bahin Scheme Money Credited : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येणार असून ते थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. या योजनेचे 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे 17 ऑगस्ट रोजी खत्यात येतील, असं सरकारनं म्हटलं आहे. परंतु आता याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Reporter) महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात :काही महिलांचं आधार कार्ड खात्याशी लिंक नाही, त्यामुळे त्यावरही प्रत्येक जिल्ह्यात लवकरात लवकर आधार खात्याशी लिंक करून घ्यावे, असे निर्देश दिलेले आहेत. त्याचबरोबर बुधवार सकाळपासून आम्ही काही महिलांच्या खात्यात पैसे भरण्यास सुरुवात केली. त्यामुळे सायंकाळपर्यंत यशस्वीरित्या त्यांच्या खत्यात पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे अजूनही काही अर्जांची पडताळणी सुरू आहे. परंतु 17 ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी एक्सलुसिव माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी "ईटीव्ही भारत"ला दिली आहे.
सावत्र भावापासून सावध राहा :मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ट्रायल रन सूरु झाली असून, त्याअंतर्गत अनेक महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेमुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे. म्हणून मी लाडक्या बहिणींना सांगितलं की, "तुम्ही सावत्र भावापासून दूर राहा... आम्ही महिलांच्या खात्यात पैसे देणार म्हटल्यावर या सावत्र भावांनी अगदी कोर्टापर्यंत धाव घेतली. पण कोर्टानंही यांना फटकारलं आहे. त्यामुळे आता महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. बुधवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
राम सातपुतेंनी केली सोशल माध्यमांवर पोस्ट :भाजपा नेते राम सातपुते यांनीही सोशल माध्यमात पोस्ट करत मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. याबाबत त्यांनी खात्यात 3 हजार रुपये जमा झाले असल्याचा फोटोही पोस्ट केला. 31 जुलैपूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. "बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळायला सुरुवात झाली. 3-4 दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनाचं पवित्र औचित्य साधून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. 31 जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांच्या लाभाची रक्कम, प्रत्येकी 3000 रुपये वर्ग करण्यात आली आहे. 31 जुलैनंतर अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे" अशी माहिती भाजपा नेते राम सातपुते यांनी सोशल माध्यमातून दिली आहे.
गणेशोत्सव उत्साहात होणार साजरा :बुधवारी मुंबईतील काही गणेश मंडळ आणि सरकारची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक गणेश मंडळाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. "गणेश मंडळांना गणेशोत्सव साजरा करताना अनेक अडचणी येतात, त्या अडचणी बैठकीत आमच्या समोर मांडल्या. त्यांची जी काय मागणी आहे त्याबाबत आम्ही त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे ठरवले आहे. गणेशोत्सव मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात आणि पर्यावरणपूरक असा साजरा करण्यात येईल," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
हेही वाचा :
- लाडकी बहीण योजनेचा अर्ज रिजेक्टेड की अप्रूव्हड?; 'नारीशक्ती दूत ॲप'वर असा तपासा अर्ज, पाहा व्हिडिओ - Ladki Bahin Yojana
- "...तर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये काढून घेईन", आमदार रवी राणांचं वादग्रस्त विधान - Ravi Rana On Ladki Bahin
- "बहिणींना पैसे दिले, पण दाजींचं काय?", अरविंद सावंत यांची राज्य सरकारवर खोचक टीका - Arvind Sawant News