महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"ते माझ्या पक्षाचे अधिकृत उमेदवार, मी प्रचाराला जाणार," नवाब मलिकांबाबत अजित पवारांची भूमिका स्पष्ट

नवाब मलिक माझ्या पक्षाचे अधिकृत उमेदवार असून, मी प्रचाराला जाणार असल्याचंही अजित पवार म्हणालेत.

ajit pawar
अजित पवार (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2024, 3:36 PM IST

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्याबाबत महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. भाजपा नवाब मलिक यांचं काम करणार नसल्याचं सांगत आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनदेखील नवाब मलिक यांना विरोध होतोय. अशातच आता राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, नवाब मलिक आमचे अधिकृत उमेदवार आहेत, त्यामुळे मी त्यांच्या रॅलीमध्ये जाणार आहे. त्यांच्यावर फक्त आरोप झालेत, ते सिद्ध झालेले नाहीत म्हणून त्यांना दोषी कसे ठरवता. उपमुख्यमंत्र्यांनी काय करावे हा त्यांचा अधिकार असल्याचं यावेळी अजित पवारांनी सांगितलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांना याबाबत विचारलं असता ते बोलत होते.

वैयक्तिक कुणाच्या विषयी बोलणं हे चुकीचं:सदाभाऊ खोतांनी केलेल्या वक्तव्याबद्दल अजित पवारांना विचारलं असता ते म्हणाले की, त्यांनी काल जे काही वक्तव्य केलंय ते अतिशय निषेधार्ह आहे. मी तीव्र शब्दात त्यांचा निषेध केलाय. त्यासंदर्भात ट्विटसुद्धा केलंय. तसेच मी त्यांना फोन देखील केला आणि तुम्ही केलेले हे स्टेटमेंट आम्हाला कुणालाही आवडले नाही, तुम्ही हे बंद करा, वैयक्तिक कुणाच्या विषयी बोलणं हे चुकीचं आहे. त्याबद्दल मी निषेध व्यक्त केलेला आहे. तुम्हाला जी भूमिका मांडायची आहे, ती मांडा, तुमची विचारधारा आणि इतरांची विचारधारा वेगळ्या असू शकतात, मतमतांतर असू शकतात, पण बोलत असताना ताळमेळ ठेवून बोललं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. तसेच ही निंदनीय घटना असून, विनाशकाले विपरीत बुद्धीसारखा प्रकार आहे. तसेच यापुढे असं होणार नाही, असं त्यांनी सांगितलंय. अशा पद्धतीची वक्तव्य महाराष्ट्र सहन करीत नाही आणि आम्हाला ते मान्य नाही, असं यावेळी अजित पवार म्हणालेत.

आज किंवा उद्यापासून यातून मार्ग काढणार:अनेक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळतायत. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, दोन-तीन ठिकाणी अशा पद्धतीने घडला आहे, ते कमी करण्याचा प्रयत्न आम्ही शेवटपर्यंत करीत होतो. काही ठिकाणी फॉर्म राहिले आहेत. भोरमध्ये अधिकृत उमेदवार नाही, पण पुरंदरमध्ये अधिकृत उमेदवार आहे. श्रीरामपूर, सिंदखेड राजा आणि देवळालीमध्ये उमेदवार आहेत, याबद्दल आमची चर्चा झालीय. आज किंवा उद्यापासून यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असंही यावेळी अजित पवार म्हणालेत.

पहिल्यांदा आमच्या योजनेवरच टीका:लाडक्या बहिणीबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, काही राजकीय लोक बनवाबनवी करायला लागलेत. महाराष्ट्रातील मतदारांना फसवायला लागलेत, आमच्या सरकारने ज्यावेळेस दीड हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आमच्यावर टीका झाली. आता धादांत खोटं आश्वासन दिलं जातंय. पहिल्यांदा आमच्या योजनेवरच टीका करीत होते, सगळ्या प्रकारची टीका केली, पण आता तीन हजार रुपये देऊ, चार हजार रुपये देऊ आणि अजून काही मोफत देऊ अशी आश्वासनं आता दिली जात आहेत. सात लाख बजेटपैकी पाच लाख आता आश्वासनात संपवले आहेत, असा टोलाही यावेळी अजित पवार यांनी लगावला. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, त्याला म्हणावं तुमचं इंजिन आणि मनसे घेऊन बस ना बाबा, बाकीचं तुला काय करायचंय, आज लोकशाहीत बहुमताचा आदर केला जातो, पक्ष हा कुणाच्या एकट्याच्या मालकीचा नसतो, असं पवार साहेब म्हटलं होतं. पुढे कुणी ना कुणी पक्ष चालवत असतं, असंही यावेळी अजित पवार म्हणालेत.

ABOUT THE AUTHOR

...view details