छत्रपती संभाजीनगर :बीड येथील संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत राजकारण न करता न्याय देण्याची मागणी केली पाहिजे. धनंजय मुंडे यांना हत्येच्या आधीपासूनच लक्ष्य केलं जात असल्याची टीका ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके यांनी केली आहे. "मनोज जरांगे यांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करावं मात्र, ओबीसींच्या हक्कावर गदा येत असेल, तर मात्र आम्ही शांत बसणार नाही. आम्ही देखील आंदोलन करून ओबीसी समाजासाठी रस्त्यावर येऊ," असा इशारा प्रा लक्ष्मण हाके यांनी दिलाय. गुन्हेगार आहे तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्यात जात शोधू नका, असं देखील त्यांनी सांगितलं.
हत्येवरून राजकारण नको :राज्यात सध्या बीड येथील संतोष देशमुख या सरपंचाच्या हत्येवरून राजकारण तापलं आहे. "अशा प्रकारच्या कृत्याचं समर्थन कोणीही करणार नाही. मात्र, त्यावरून राजकरण करणं अतिशय चुकीचं आहे. जर एखाद्या लोकप्रतिनिधीला चुकीच्या पद्धतीनं लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला गेला, तर तशीच पद्धत राज्यात रुजू होईल. राजकारण करायचं असेल, तर तेथील प्रश्नांवर, विकासासाठी झालं पाहिजे. मात्र एखादी हत्या होते आणि त्याचं गांभीर्य जाईल, अशा पद्धतीनं राजकारण करणं चुकीचे आहे," असं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं. "राज्यात संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली त्यांना क्रांतीचौक भागात श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. तर ओबीसी समाजासाठी आंदोलन ठेवण्यात आलं. यात धनंजय मुंडे यांना समर्थन का देऊ नये? त्यांची काही चूक नाही," असं ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके यांनी सांगितलं.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंशी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी साधलेला संवाद (Reporter) धनंजय मुंडे यांच्यासाठी आंदोलन :गेल्या महिनाभरापासून राज्यात बीड येथील हत्येचे पडसाद उमटत आहेत. त्यात परळी मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजकारण तापत आहे. त्यांची मंत्रपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे. मात्र निवडणुकीच्या आधीपासूनच त्यांना मुद्दाम लक्ष्य केलं जात आहे, असा आरोप प्रा लक्ष्मण हाके यांनी केलाय. आधी धनंजय मुंडे आमदार होऊ नये म्हणून, नंतर मंत्री होऊ नये यासाठी आणि शेवटी त्यांना पालकमंत्री करू नये, यासाठी लक्ष्य केलं गेलं. ते लोकप्रतिनिधी आहेत, एखाद्याच्या ओळखीचे आहेत, म्हणून त्यांच्यावर दोष देणं योग्य नाही. आका शोधायचा तर एखाद्या प्रकरणात पंतप्रधान देखील एखाद्याचे आका निघतील, तर मग कसं होईल. त्यामुळे धनंजय मुंडे यांना लक्ष्य करणं बंद करावे आणि गुन्हेगाराला शासन करण्यासाठी लक्ष ठेवावं, असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सांगितलं.
आम्ही देखील आंदोलन करणार :मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पुन्हा 25 जानेवारीपासून आंदोलनात उतरणार आहेत. त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन करावं, त्यावर आम्ही बोलणार नाही. त्यांनी त्यांचं काम करावं. मात्र, ओबीसी समाजाच्या हक्काला धक्का लागणार असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. आम्ही देखील आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणार, असा इशारा ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके यांनी दिला. तर वंजारी आणि मराठा यांच्यातील वाद अनेक वेळा झाले आहेत. मात्र त्यावर राजकारण करू नका, असं देखील त्यांनी सांगितलं.
हेही वाचा :
- मनोज जरांगेंची चिथावणीखोर भाषा; ओबीसी नेते आक्रमक, लक्ष्मण हाकेंनी दिला 'हा' इशारा
- ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक; नाना पटोले म्हणाले, "कायदा आणि सुव्यवस्था..."
- लक्ष्मण हाकेंना हवंय कॅबिनेट मंत्रिपद, महायुतीकडे केली 'ही' मागणी