कोल्हापूर Kolhapur Dog News : जंगली चपळ चित्त्याप्रमाणे त्याची धाव, मालकाची झलक दिसताच वाऱ्याप्रमाणं धावणारा 'बाल्या' नावाचा श्वान कर्नाटक आणि महाराष्ट्रातील कोणत्याही शर्यतीत नसेल तर ती शर्यत जणू अपूर्णच. गेली दहा वर्ष शर्यतीमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या बाल्याचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. लाडक्या बाल्याच्या जाण्यानं व्याकूळ झालेल्या व्हरगे कुटुंबानं घरातील सदस्याप्रमाणे त्याचा अंत्यविधी केला. दोन दिवसांपूर्वी बारावं त्याचं श्राद्ध घालून 400 जणांना अन्नदान करण्यात आलं. पाळीव प्राण्याप्रती व्यक्त झालेल्या या संवेदनांनी अनेक कोल्हापूरकर हळहळले.
कोल्हापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाचगावात राहणाऱ्या दीपक व्हरगे यांनी 2011 साली श्वानाचं पिल्लू घरात आणलं होतं. 'बाल्या' हा लहानपणापासूनच धावण्यात तरबेज होता. यामुळं कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या गावांमध्ये होणाऱ्या श्वान स्पर्धेत तो सहभागी व्हायचा. अल्प कालावधीतच बाल्याची लोकप्रियता कमालीची वाढली. गेल्या दहा वर्षात त्यानं कोणतीही श्वानस्पर्धा विजयी न होता सोडलेली नव्हती. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात झालेल्या श्वान स्पर्धांमध्ये त्यानं अनेक पारितोषिकं पटकावत आपले मालक दीपक व्हरगे यांची महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सलग सहा चॅम्पियनशिप जिंकल्यामुळं कोल्हापूरसह सीमा भागात त्याला 'हिंदकेसरी बाल्या' म्हणूनही ओळखलं जायचं. घरच्या सदस्याप्रमाणे असलेल्या या श्वानाचं 4 ऑगस्ट रोजी निधन झालं. त्याच्या निधनानंतर तीन दिवसांचा दुखवटाही पाळण्यात आला.
बाल्यामुळं पाचगावचा नावलौकिक वाढला : पाचगावच्या व्हरगे कुटुंबीयांनी बाल्याचा 14 वर्षे पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला होता. कर्नाटक महाराष्ट्रासह अनेक स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या बाल्यामुळं पाचगावचा नावलौकिक वाढला होता. करवीर तालुक्यातील पाचगावला बाल्याचं गाव म्हणून ओळखलं जातं, ही समाधानाची बाब असल्याचं माजी सरपंच संग्राम पाटील म्हणाले.