मुंबई Orange Alert To Mumbai :राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे बळीराजा सुखावला असून, शेतीच्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज वर्तवला असून, राज्यात मध्यम ते मुसळधार, मुसळधार अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागानं आज कोकणासह अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज :भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुंबई डिव्हिजननं दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आहे. सोबतच हवामान विभागानं विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. पावसाचा जोर पाहता नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.
मुंबईत पावसाची संततधार सुरू :मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबईसह कोकण आणि इतर अनेक भागांसाठी हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. शनिवारी सकाळपासून मुंबईत पावसाची रिमझिम सुरू आहे. पावसामुळे मुंबईतील एपीएमसी मार्केट, तुर्भे, मॅफ्को, नवी मुंबई, किंग्ज सर्कलसह अनेक भागात पाणी साचल्यानं नागरिकांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागत आहे. अशातच आज सायंकाळपर्यंत हाय टाईडची देखील शक्यता हवामान विभागानं वर्तवल्यानं प्रशासकीय यंत्रणा देखील तयारीला लागल्याचं चित्र आहे.
महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा :मुंबईतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेनं "महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन" मुंबईकरांना केलं आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज मुंबईसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज देत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सोबतच कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- मायानगरी मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईला ऑरेंज तर ठाण्यात येलो अलर्ट जारी - IMD Issues Orange Alert
- मुसळधार पावसाचा दणका; रेल्वे वाहतूक विस्कळीत, तब्बल 50 विमान उड्डाणं रद्द, प्रवाशांना मनस्ताप - Heavy Rain In Mumbai