सिंधुदुर्ग Holi Shimogotsav : सिंधुदुर्गातील सांगेली गावात फणसाच्या झाडाला ग्रामदैवत गिरोबा म्हणून दैवत मानलं जातं आणि त्याची प्रतिष्ठापना केली जाते. होळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. ही आगळीवेगळी पंरपरा पूर्वीपासून सुरू आहे. यावर्षी गिरिजानाथाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी सनामटेंबवाडीतील तानाजी ऊर्फ न्हानू यशवंत सनाम यांच्या घराजवळच्या फणसाच्या झाडाची निवड करण्यात आली होती. ''हर हर महादेव" च्या जयघोषात लाखो भाविकांच्या उपस्थितीत गिरोबाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
फणसाच्या झाडाला मानतात दैवत : तळकोकणात सण म्हटल की वेगवेगळ्या रुढी परंपरा पाहायला मिळतात. गणेशोत्सवानंतर कोकणातील मोठा सण म्हणजे शिमगोत्सव. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळीच्या आदल्या दिवशी पासून शिमगोत्सव सुरू होतो. अशीच एक आगळीवेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा सावंतवाडीत सांगेली या गावात सुरू आहे. या गावात ग्रामस्थ एकत्र येत देव म्हणून फणसाचं झाड ठरवतात. मग ते झाडं तोडून गोलाकार आकार देऊन त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते आणि मध्यरात्री विधिवत प्राणप्रतिष्ठापणा करुन मंदीरात ठेवलं जातं. सांगेली गावचं ग्रामदैवत झाड असलेलं हे देशातील एकमेव मंदिर आहे. हिंदू संस्कृतीत वड, औदुंबर, पिंपळ अशा वृक्षांना दैवत मानलं जातं. अशीच एक परंपरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली गावात आहे. या गावात फणसाच्या झाडाला गिरोबा म्हणून दैवत मानलं जातं.