नागपूर Gold Seized At Nagpur Airport :आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे सोनं तस्करीचा प्रयत्न सीमा शुल्क विभागानं हाणून पाडला आहे. सोन्याची तस्करी प्रकरणी केरळमधील तस्करास अटक करण्यात आली आहे. त्या तस्कराकडून 549 ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोळा जप्त करण्यात आला. या सोन्याची किंमत 34 लाख रुपये इतकी आहे. तस्करानं शारजा इथून सोनं तस्करी करून आणलं असून त्यानं सोनं अंतर्वस्त्राच्या आत लपवून आणलं होतं. कस्टम पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली असून तस्करी करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीमाशुल्क कायदा 1962 अन्वये कस्टमच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे.
शारजातून केली होती सोन्याची तस्करी :एअर इंटेलिजन्स युनिट आणि एअर कस्टम्स युनिटला गोपनीय माहिती मिळाली होती. कतार एअरवेजच्या फ्लाइट क्र. क्यूआर 590 या विमानानं प्रवास करत असलेला प्रवासी हा सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्या माहितीच्या आधारे संशयित तस्कराला थांबवून चौकशी करण्यात आली. यावेळी तो उडवाउडवीची उत्तरं देत होता. त्यामुळं त्या तस्कराची अंगझडती घेण्यात आली. अंगझडतीत त्याच्या अंतर्वस्त्रात 549 ग्रॅम सोन्याचा गोळा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्दे मालाची किंमत 34 लाख रुपये इतकी आहे.