सातारा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Helicopter Emergency Landing) यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. मुख्यमंत्री शिंदे यांचं मूळगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील दरे येथून हेलिकॉप्टरनं ते मुंबईसाठी रवाना झाले होते. खराब हवामानामुळं हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे रस्त्यानं पुण्याला रवाना झाले.
हवामानात अचानक झाला बदल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील मूळगावी आले होते. त्यानंतर ते शुक्रवारी दुपारी मुंबईला जाण्यासाठी हेलिकॉप्टरनं निघणार होते. मूळगाव असलेल्या दरेवाडी येथील हेलिपॅडवर हेलिकॉप्टर टेक ऑफसाठी तयार झालं होतं. त्यावेळी हवामान स्वच्छ असल्यानं पायलटनंही टेक ऑफचा निर्णय घेतला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच हवामानात बदल झाला. अचानक खूप ढग दाटून आले व पाऊस पडण्यास सुरुवात झाली. अशावेळी हेलिकॉप्टर पुढं नेणं योग्य नसल्यानं पायलटनं पुन्हा हेलिकॉप्टर मूळस्थानी लँड करण्याचा निर्णय घेतला. टेक ऑफच्या अवघ्या पाच मिनिटात हेलिकॉप्टर पुन्हा लँड करण्यात आलं.
पाच मिनिटात हे हेलिकॉप्टर पुन्हा लँड : "पुणे आणि सातारा येथे हवामान स्वच्छ होतं, पण हेलिकॉप्टर टेक ऑफ केल्यानंतर अचानक काही ढग तयार झाले. पायलटनं कोणताही आपत्कालीन कॉल केला नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून पायलटनं हेलिकॉप्टर मूळ स्थानावर नेण्याचा निर्णय घेतला. टेक ऑफ झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात हे हेलिकॉप्टर पुन्हा लँड करण्यात आलं. दुपारी चारच्या सुमारास हे हेलिकॉप्टर परत आलं. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाहनानं पुणे विमानतळाकडं रवाना झाले," अशी माहिती सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांचा तातडीचा दौरा :आचारसंहिता जाहीर झाली त्याच दिवशी मुख्यमंत्री आपल्या दरे (ता. महाबळेश्वर) गावी येणार होते. मात्र, आचारसंहिता जाहीर होणार असल्याने त्यांनी आपला दौरा रद्द केला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारचा दौरा गुप्त ठेवून हेलिकॉप्टरने ते दरे गावी आले. यावेळी त्यांनी मंदिरात पूजाअर्चा केली. तसेच शेतीमध्ये फेरफटका मारला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या तातडीच्या दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.