शिर्डी ( अहमदनगर ) - बुद्धीबळपटू ग्रॅंडमास्टर आर. प्रज्ञानंद यानं साई मंदिराला भेट दिली. साईबाबांची महिमा ऐकून आज सहपरिवार शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलो असल्याचं अर्जुन पुरस्कार विजेता आर प्रज्ञानंद यानं सांगितलं. साईबाबांच्या दर्शनानंतर तो ई टीव्ही भारतशी बोलत होता.
बुद्धीबळ स्पर्धेच्या ग्रॅंडमास्टर 2022 आणि 2024 चा विजेता आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त आर. प्रज्ञानंद आणि त्याची बहिण आर. वैशाली यांनी आज आपल्या आई आणि मामासह शिर्डीत साई मंदिरात साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी त्यानं साईबाबांच्या द्वारकामाई तसेच गुरुस्थान मंदिरात जावून दर्शनही घेतलं आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर साईबाबा संस्थानचे जनसंपर्क प्रमुख तुषार शेळके यांनी प्रज्ञानंद याचासह कुटुंबीयांचा साई मूर्ती व शॉल देऊन सत्कार केला.
"माझे मामा साईबाबांचे परमभक्त असून दर महिन्याला साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येतात. मामांकडून साईबाबांची महिमा आणि साईबाबांचे विचार ऐकून माझीही साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याची ईच्छा झाली आणि आज सहपरिवार साईबाबांच्या दर्शनासाठी आलो आहे. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन मनाला समाधान मिळालं. साईबाबाचा मंदिर परिसर अतिष्य स्वच्छ आणि सुंदर असल्याच पाहून खुप आनंद झाला", असं आर प्रज्ञानंद याने संस्थानचे जनसंपर्क प्रमुख तुषार शेळके यांचा बोलतांना सांगितलं.
माझी मोठी बहीण वैशाली आणि मला टीव्हीवर कार्टून पाहण्याची खुप सवय लागली होती. यामुळे आईने आम्हाला टीव्हीपासुन दूर करण्यासाठी बुद्धीबळ शिकवले. टीव्हीवर कार्टून पाहण्यापेक्षा बुद्धीबळाच्या खेळानं ज्ञान वाढतं, यामुळे आम्ही बुद्धीबळ खेळण्यास सुरवात केली आणि आज अर्जुन पुरस्कार विजेता ठरलो आहे. आईमुळे आज आम्ही बहीण भाऊ इथपर्यंत पोहचलो असल्याचही प्रज्ञानंदनं तुषार शेळके यांच्याशी बोलतांना सांगितले आहे. दरम्यान , साईबाबा मंदिरातील अधिकारी राजेंद्र पवार , जनसंपर्क प्रमुख तुषार शेळके व साईबाबा मंदिर सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी यावेळी उपस्थिती होते.