मुंबई Akshay Shinde Encounter : बदलापूर येथील दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याप्रकरणी राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अक्षयचा एन्काउंटर झाला नसून त्याची हत्या करण्यात आली, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांकडून केला जातोय. दरम्यान, अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह दफन करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. मात्र, अक्षय शिंदेचा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा देण्यास स्थानिकांचा विरोध आहे. याबाबत आज झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला जागा उपलब्ध करून देण्याचा आदेश दिलाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली.
सोमवारपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात यावे :बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला दफन करण्यासाठी जागा शोधण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला दिलाय. मात्र, या जागेबाबत जाहीर माहिती न देता जागा निश्चित झाल्यावर अक्षयच्या कुटुंबियांना त्याची माहिती देण्यात यावी, असं न्यायालयानं म्हटलं. सोमवारपर्यंत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावे, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. याप्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी होईल. सरकारी वकील वेणेगावकर यांनी राज्य सरकारतर्फे जागा शोधण्यात येईल, अशी ग्वाही दिली.