मुंबई : मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वाचा जागर करत निर्माण केलेली शिवसेना पुढे मोठ्या पक्षात रुपांतरीत करणारे बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक पटलावर कायम हे नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राजकीय नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामध्ये पंतप्रधानांपासून महाराष्ट्र काँग्रेसपर्यंत सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटरवरून एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलय. तसच, हिंदुहृदयसम्राट श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी सादर नमन अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलय.
शरद पवारांनीही केलं अभिवादन : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सामाजिक प्रश्नांवर आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून भाष्य करणारे एक कुशल व्यंगचित्रकार होते. आपल्या अमोघ वकृत्वाद्वारे मराठी माणसांच्या मनात त्यांनी एक धगधगता स्वाभिमान जागृत केला. मराठी माणसाच्या हितासाठी नेहमीच रोखठोक भूमिका घेणारे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलय. दरम्यान, अमोघ वक्तृत्वाची देणगी लाभलेले, महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी लढा उभारणारे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अभिवादन केलय.