अमरावती :विधानसभा निवडणुकीसाठी आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले असताना आता दोन-तीन दिवस विनाकारण रात्री फिरायचं नाही, असा आदेश पोलीस आयुक्तांनी काढला. अमरावती शहरात रात्री फिरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली जात असून वाहनांची झडती देखील घेतली जात आहे.
सर्व मुख्य चौकात बॅरिकेट्स :शनिवारी (17 नोव्हेंबर) रात्रीपासून अमरावती पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. शहराच्या सीमेवर अनेक दिवसांपासून बॅरिकेट्स लावून वाहनांची झडती घेतली जात असतानाच आता शहरातील सर्व मुख्य चौकात बॅरिकेट्स लावून रात्री फिरणाऱ्या वाहनांची झडती घेतली जात आहे. राजकमल चौक, चित्रा चौक, जयस्तंभ चौक, राजापेठ चौक, नवाथे चौक, दसुरनगर ,पंचवटी चौक, शेगाव नाका, कठोरा नाका , नवसारी, बियाणी चौक, अर्जुन नगर या सर्व मुख्य भागात पोलीस तैनात असून रात्री 10 नंतर रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येकाची चौकशी केली जात आहे.
अमरावती पोलिसांकडून चौकशी सुरु (Source - ETV Bharat Reporter) पोलिसांची विशेष मोहीम : "निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवसा आणि रात्री पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. शहराच्या झोन क्रमांक एक आणि झोन क्रमांक दोन अशा दोन्ही हद्दीत नाकेबंदी लावली जात आहे. यासोबतच सर्व कार्यालय, व्यावसायिक प्रतिष्ठान, हॉटेल्स आता दिलेल्या वेळेत बंद होतील, अशा सूचना देण्यात आल्या आहे. यासोबतच अनावश्यक गर्दी होणार नाही, कोणी कोणत्याही दुकानावर थांबणार नाही, याबाबत देखील आम्ही सर्वांना सुचित केलं," असं पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितलं. "टपोरी मुलांनी अनावश्यक एकत्र जमू नये, आम्ही आता कारवाई करणार आहोत. प्रत्येकानं नियमांचं पालन करावं," असं आवाहन देखील गणेश शिंदे यांनी केलं.
हेही वाचा
- "मी तळागाळातील कार्यकर्ता, मला विजयाची शंभर टक्के गॅरंटी"
- पॉलिटिकल 'सुपर संडे', दिग्गज नेते तसंच सेलेब्रिटींच्या उपस्थितीत सभांचा धडाका
- "गुजराती माणसं आणून बसवायला मराठी माणूस मेला का?" उद्धव ठाकरेंचा घणाघात