महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अभिनेत्री प्रिया तुळजापूरकरांनी सांगितला 26 जुलै 2005 मुंबई मधील महाप्रलयचा अनुभव - Mumbai floods 26 July 2005 - MUMBAI FLOODS 26 JULY 2005

Mumbai floods 26 July 2005 : आजपासून 19 वर्षापूर्वी 26 जुलै 2005 रोजी मुंबईला महापूरानं वेढलं होतं. यामध्ये हजारो माणसं मृत्युमुखी पडली होती. त्या दिवशी गेल्या 100 वर्षातला सर्वाधिक पाऊस कोसळला होता. या महापूराच्या अनेक आठवणी ताज्या करणारा एक थरारक अनुभव अभिनेत्री प्रिया तुळजापूरकरांनी सांगितला आहे.

experience of the 26 July 2005 Mumbai deluge
26 जुलै 2005 मुंबई मधील महाप्रलयचा अनुभव (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 5:54 PM IST

नाशिक - मुंबईकर 26 जुलै 2005 मधील महाप्रलयाचा अनुभव कधीही विसरणार नाहीत. याच दिवशी मुंबईने सर्वात मोठी जीवितहानी झाली होती.
यामध्ये एक हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता, तर 14 हजाराहून अधिक घरं उद्ध्वस्त झाली होती. या दिवशी 24 तासात तब्बल 944 मिली पाऊस पडला होता, जो गेल्या तेव्हा 100 वर्षातला सर्वाधिक पाऊस होता. याच दिवशीचा अनुभव मराठी अभिनेत्री प्रिया तुळजापूरकर यांनी सांगितला, विशेष म्हणजे त्यावेळच्या ईटीव्ही मराठी चॅनल द्वारे नातेवाईकांशी संपर्क झाल्याचही तुळजापूरकर यांनी सांगितलं..



26 जुलै 2005,माझ्या आयुष्यातला अत्यंत भयावह आणि आठवणीत कोरला गेलेला दिवस. अख्खा महाराष्ट्राभर पावसानं धुमाकूळ घातला होताच, पण मुंबईमध्ये मी तो पूर्ण दिवस आणि रात्र ज्या पद्धतीने जीव मुठीत धरून काढला ते कधीच विसरू नाही शकत. खरं तर मी नुकतीच मुंबईला गेले होते आणि रिलायन्स इन्फोकॉममध्ये नोकरी करायला सुरुवात केली होती. राहायला सेंट्रल माटुंगा आणि नोकरीसाठी रोज चर्चगेट गाठावे लागायचं. त्या दिवशी मला आठवत नाही पण कशासाठी तरी मी सुट्टीवर होते आणि अचानक काही कामासाठी मला अंधेरीमध्ये सातबंगला येथे जायला लागलं. माटुंग्याहून दुपारी एक दीड वाजता निघून इच्छित स्थळी पोचायला मला साधारण अडीच वाजले होते, पाऊस सकाळपासून थांबायचं नावच घेत नव्हता. मी मुंबईमध्ये अनुभवत असलेला तो पहिलाच जोरदार पाऊस होता. माझं काम करून साधारण अर्ध्या पाऊण तासानं मी तिथून बाहेर पडले आणि हबकलेच.



पावसाने इतका जोर पकडला होता की समोरचं तर काही दिसत नव्हतंच पण ज्या इमारतीत मी गेले होते, तिच्या पार्किंग मध्ये पूर्णपणे पाणी भरलं होतं. मी बाहेर येऊन बघते तर काय, जशी काही नदीचं वाहायला लागली होती. पाण्यानं माझ्या गुडघ्यापर्यंत पातळी गाठली होती. बर या सगळ्यामुळे रस्त्यावर बस, रिक्षा, टॅक्सी दिसायला ही तयार नव्हती. कुणी दिसलंच तर थांबायला तयार नव्हतं. महत्प्रयासाने एका रिक्षावाल्यानं मेहेरबानी केली आणि एकदाची मी रिक्षात बसून अंधेरी स्थानकाकडं निघाले, अर्थात हा माझा गैरसमजच ठरला.. सातबंगला बस आगारापासून जेमतेम पाच मिनिटं अक्षरशः रांगत असल्यासारखी कशीबशी ती रिक्षा पुढे गेली आणि पाण्याचा वाढता लोंढा पाहून चालकाचं अवसान गळालं.. त्यानं सांगून टाकलं की ताई पैसे नका देऊ तुम्ही, उतरून घ्या, मी काही माझी गाडी पुढे नेण्याचं धाडस नाही करू शकत.. मला ही काय करावं ते सुचत नव्हतं, शेवटी मी त्याचे जे काय पैसे झाले ते त्याला जबरदस्तीने देऊन रिक्षातून उतरून घेतलं.



आता परिस्थिती अशी होती की अंधेरी स्थानकापर्यंत चालत जाण्यावाचून गत्यंतर उरलं नव्हतं. पाणी तर वाढतच होतं, वरून पाऊस ही भयाण झोडपत होता, नेलेल्या छत्रीनं मला खूप वाचवायचा प्रयत्न केला, पण पाणी एव्हाना माझ्या कंबरेपर्यंत पोहोचलं होतं आणि मी चाललेले अंतर म्हणजे फक्त चारबंगला चौकापर्यंत. मी चालत राहिले, पण तेवढ्यात समोरून एकजण रिक्षा घेऊन आला आणि म्हणाला मॅडम किधर जा रहे हो? स्टेशन की तरफ जा रहे हो तो यहाँ से मत जाओ क्यूंकी पूरा एस वी रोड डूब रहा है पानी में.. हे ऐकून मी अजून जास्त तणावात गेले, त्याच्याशी थोडं बोलेपर्यंत पाणी माझ्या कमरेवरून पुढे छातीच्यावर पोहोचलं होतं, पाऊस थांबणं तर सोडाच पण कमी होण्याचंही नाव घेत नव्हता. मला जाम भीती वाटायला लागली होती, पण तरी ही मी पुढे चालत राहिले.. शेवटी डी एन नगर चौकात मात्र, पोलिसांनी अडवले आणि उजवीकडचा वर्सोवा सर्कलचा रस्ता घ्यायला सांगितला.



मी त्या दिशेने चालायला लागले, पाहिलं तर पाणी जरा कमी होतं तिकडे म्हणजे माझ्या कमरे पर्यंत होतंच… पण भीती इकडे अशी होती की सगळे ड्रेनेज झाकणं पाणी ओसरावे म्हणून काढून उघडे केलेले होते. तियीनपळं ते कुठं कुठं आहेत ते फार लक्षपूर्वक पाहून चालावं लागतं होतं. इतक्यात जरा आजूबाजूला पाहिलं तर माझ्यासारखे बरेच जण असेच रस्ता दुभाजकाच्याअगदी बाजूने चालत होते.. थोड्यावेळानं सगळ्यांनी नकळत पणे एकमेकांचे हात पकडून मानवी साखळी करून चालायला सुरुवात केली.. तेवढाच मानसिक आधार.. ड्रेनेज जिथं होतं साधारणपणे तिथे भोवरा तयार झालेला दिसत होता, तसे सगळेजण एकमेकांना सावध करून ते टाळून पुढे जात होतो आम्ही..


त्या रस्त्याला लागून साधारण एक किलोमीटरचे अंतर कापायला मला त्या दिवशी दीड पावणेदोन तासा पेक्षा ही जास्त वेळ लागला म्हणजे अक्षरशः तीन साडेतीन किलोमीटर अंतर चालायला त्यादिवशी साधारण दुपारी तीन ते संध्याकाळी सात इतका वेळ लागला.. बसेस, गाड्या, रिक्षा, दुचाक्या असा असह्य वाहतूक खोळंबा झाला होता.. मला काय करावे ते सुचंना कारण अंधार झाला होता आणि हातपाय पाण्यातून सलग इतका वेळ चालत राहिल्यानं गारठून गेलं होतं. त्यातून पोहता येत नसल्यानं वेगळीच भीती वाटत होती की उघडून ठेवलेल्या ड्रेनेजमध्ये चुकून माकून पाय घसरून वाहून गेले तर घरी कुणाला कळणार ही नाही.. या द्विधा मनस्थितीमध्ये मी एका बसमध्ये चढून घेतलं.. पाहिलं ही नाही की ती बस कुठून कुठं जातेय, मनात फक्त इतकाच विचार होता की पाऊस कमी झाल्यावर त्या बसमधून उतरून रिक्षानं अंधेरी स्थानक गाठून लोकल ट्रेननं लवकरात लवकर घर कसं गाठता येईल.. पण बस मध्येही नऊ वाजले तरी पाणी ही ओसरलं नव्हतं आणि पाऊस पण मुसळधार, संततधार… अक्षरशः काहीच सुचेना.. पाणी बसच्या गिअर बॉक्स च्या पातळीवर पोचले होते.



हळूहळू भुकेची जाणीव व्हायला लागली होती.. पण नाईलाज होता. मुकाट्याने बसून राहिले. पण त्यादिवशी माणुसकीचा खूप हृदयस्पर्शी अनुभव ही येणार होता हे माहीत नव्हतं. आजूबाजूच्या इमारतींमध्ये राहणारी काही भली माणसं सगळ्या बसमध्ये जाऊन आधी पाणी वाटत होती, त्यानंतर काही जणांनी गरमागरम तांदळाची खिचडी आणून प्रत्येकाला बशी भरून वाटली.. डोळे भरून आले अक्षरशः.. आज आत्ता ही आठवण लिहिताना ही मला खूप भरून येतंय.. खिचडी खाऊन, पाणी पिऊन आम्ही त्यांना मनापासून धन्यवाद देऊन दुवा ही दिले.. तोवर नैसर्गिक विधींनी डोकं वर काढायला सुरुवात केली होती, बसमध्ये अनेक स्त्रियांची चुळबूळ सुरू असलेली माझ्या लक्षात आली पण संकोच . शेवटी त्या खिचडी घेऊन आलेल्या सद्गृहस्थांना मी विनंती केली धीर करून, मग त्यांनी आम्हा दहा पंधरा जणींना त्यांच्या घरी नेलं.. विद्युत पुरवठा खंडित झाला होता तरी ही या बाबत त्यांनी आणि त्यांच्या घरच्यांनी आम्हा सगळ्यांना याबाबत पूर्ण सहकार्य केलं. आभार मानायला खरोखर शब्द फुटत नव्हते, गळा भरून आल्यामुळे. तिथून निघून आम्ही पुन्हा बसमध्ये येऊन बसलो. त्यादिवशी सगळ्या गोंधळात मोबाईलच्या सगळ्या नेटवर्कनं ही मान टाकली होती.. पण कसं कुणास ठाऊक माझ्या एकटीच्या अत्यंत जुन्या फोनचे नेटवर्क मात्र देवाच्या कृपेनं जबरदस्त होतं.. मग मी जिथे राहत होते, तिथे शेजारच्या काकूंना थोडक्यात परिस्थिती कळवून दिली. ते ही सगळे काळजीत होते माझ्यासाठी.. मग बसमधल्या जवळपास सगळ्याच म्हणजे ज्यांच्या फोनचा इश्यू झाला होता त्या पंचवीस तीस लोकांनी माझा फोन वापरून आपापल्या लोकांना ओढवलेली परिस्थिती कळवली. रात्रीचे बारा वाजून गेल्यावर मात्र प्रचंड थकवा, असहाय्यपण आणि एकंदरीत दिवसभरातल्या त्रासाने डोळे मिटायला लागले होते. पण डास ही चावत होते, थंडी ही वाजत होती, अंग ही प्रचंड दुखत होतं. सुचतच नव्हतं काय करावं.. शांत बसून राहण्याशिवाय हातात काहीच नव्हतं.



अशीच कशीबशी रात्र काढली.. पहाटे पाच वाजता बाहेरचा अंदाज घेतला तर पाऊस थांबला होता आणि पाणी ही बऱ्यापैकी ओसरले होते. त्यामुळे धीर एकवटून मी उतरले बसमधून आणि अंधेरीच्या दिशेने चालायला सुरूवात केली. एरवी जेमतेम अर्ध्या तासाचं अंतर त्यादिवशी मात्र दोन अडीच तासानं संपलं.. सकाळी साडे सात वाजता अंधेरीला परिस्थिती अशी होती की चर्चगेट पासून आणि चर्चगेट कडे जाणाऱ्या येणाऱ्या लोकल ट्रेन आदल्या दिवशी दुपारपासून बंदच होत्या. सकाळी सहानंतर फक्त अंधेरी ते बोरिवली अशी रेल्वे वाहतूक सुरू झाली होती, ज्याचा मला काहीच उपयोग नव्हता. मी पाहिलं की बऱ्याच जणांनी रेल्वे रुळांवर. चालायला सुरूवात केली होती. मी ही मनाची तयारी करून सकाळी आठ वाजता चालायला सुरूवात केली. तास पाहायला गेलं तर अंधेरी ते दादर हे अंतर लोकलने चौदा मिनिटाचेच पण त्यादिवशी चालत असताना जी काय हालत खराब झाली होती की ज्याचं नाव ते. सकाळी आठ वाजता अंधेरीपसून रुळांमधून चालत निघालेली मी दुपारी दीड वाजता बांद्रा स्थानकात पोहोचले, तिथून पुढं जाताना पुन्हा खाडीचा अडथळा असल्यानं त्याची भीती होतीच मग बाहेर आले. पाहिला तर टॅक्सी सुरू होत्या.. महत्प्रयासाने एकाला विनवणी केली की माटुंग्याला सोड तर त्यानं फक्त प्लाझा पुलानंतर असणाऱ्या पारशी डेअरी पर्यंत सोडलं, ते ही पूर्णपणे पाचशे रुपये मोजून घेऊन, त्याचं वाईट वाटलं. मनात विचार आला की कुठे ती आदल्या रात्री भेटलेली , खाऊपिऊ घालणारी देव माणसं आणि कुठे ही अशी परिस्थीतीचा गैरफायदा घेणारी संधीसाधू माणसं. पण नाईलाज होता. तिथून माटुंग्याला घरी पोचायला साधारण एक तास गेलाच, कारण तिथे ही गुडघ्यापर्यंत पाणी होतंच. खरं तर तिथून माझं राहतं घर मोजून दहाव्या मिनिटाच्या अंतरावर होतं.. असो..



कशीबशी घरी पोचून पहिल्यांदा गरम पाण्यानं आंघोळ केली, काहीतरी खाऊन दुपारी चार वाजता जे झोपले ती दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता उठले. इतका शारीरिक आणि मानसिक तणाव घेऊन थकले होते. उठल्यावर मात्र तडक उठून बॅग भरून बसनं घरी निघून आले. आज या गोष्टीला एकोणीस वर्ष झाली, पण आठवताना अजून ही काटा येतोय अंगावर...


तसं पाहायला गेलं तर अगदीच भोज्ज्याला शिवून ही सुदैवानं सुखरूप परत आले होते. कारण नंतर टीव्ही वर बातम्या पाहताना कळलं होतं की असंख्य माणसं गेली वाहून त्या पाण्यात, बरीच माणसं गाडीच्या काचा बंद असल्यानं गुदमरून मृत झाली. बरीच लहान मुलं देखील वाहून गेली. पण कुठले तरी कधीतरी चांगले केलेले माझे कर्मच असेल कदाचित की मी सुखरूप राहिले. मात्र मला याच 26 जुलै 2005 मधल्या पावसाच्या प्रलय प्रकोपामुळे एक लक्षात आले की कुठली ही परिस्थिती आली तरी मी निभावून नेऊ शकते.



या सगळ्यांमध्ये मला एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की त्या दिवशी संध्याकाळी ईटीव्ही मराठीने आपातकालीन परिस्थितीची मेसेज सुविधा सुरू केल्यामुळे मी माझ्या घरच्यांना कळवू शकले की मी सुखरूप आहे..त्यासाठी ईटीवी मराठीचे असंख्य आभार. पण एक सांगू? इतक्या महाभयानक अनुभवानंतर देखील माझी पावसाबद्दल वाटणारी ओढ अजिबात कमी झालेली नाही.अजून देखील पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद मी गमावू नाही इच्छित कधीच.. परमेश्वर आपल्या सोबत असतोच सदैव हे मात्र निश्चित जाणवले या सगळ्या अनुभवा मुळे, असं अभिनेत्री प्रिया तुळजापूरकर यांनी आपल्या अनुभव कथनात म्हटलंय.

ABOUT THE AUTHOR

...view details