महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अल्पवयीन मुलगी गर्भवती; गर्भपात करायचा की प्रसूती, हा मुलीच्या निवडीचा विषय - मुंबई उच्च न्यायालय - Bombay High Court - BOMBAY HIGH COURT

Bombay High Court : प्रेम संबंधातून गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीनं गर्भपात किंवा प्रसूतीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गर्भपात करायचा की प्रसूती करायची हा मुलीच्या निवडीचा व तिच्या शरीरावरील हक्काचा विषय असल्याचं न्यायालयानं नमूद केलं.

bombay high court
मुंबई उच्च न्यायालय (Source : ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2024, 8:49 PM IST

मुंबई Bombay High Court : गर्भपातसाठी याचिका दाखल केलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रसूती करण्यासाठी उच्च न्यायालयानं परवानगी दिली. सदर अल्पवयीन मुलीनं प्रारंभी गर्भपातासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, नंतर आरोपीसोबत लग्नाची तयारी दाखवल्यानं गर्भपात ऐवजी प्रसूती करण्याची तयारी मुलीनं दाखवल्यानं न्यायालयानं हा गर्भ वाढवण्यास व प्रसूती करण्यास परवानगी दिली. गर्भपात करायचा की प्रसूती करुन बाळाला जन्म द्यायचा हा मुलीच्या निवडीचा व तिच्या शरीरावरील हक्काचा विषय असल्याचं न्यायालयाने नमूद केलं.

स्वतःच्या शरीरावर हक्क : संबंधित व्यक्तीसोबत सदर अल्पवयीन मुलीचं प्रेम प्रकरण होतं. त्या व्यक्तीसोबत पीडित मुलगी लग्न करणार असल्याचं न्यायालयाला सांगण्यात आलं. त्यामुळं गर्भपात न करता गर्भाला वाढवण्याचा निर्णय घेण्याबाबत न्यायालयाला माहिती देण्यात आली. मुलीचा तिच्या स्वतःच्या शरीरावर हक्क आहे, याकडे न्यायालयानं लक्ष वेधले.

प्रसूती करण्याचा निर्णय : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस.गडकरी व न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. 22 वर्षांच्या तरुणाकडून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारातून ती मुलगी गरोदर राहिली. गर्भाला 26 आठवडे झाल्यानंतर तिनं गर्भपातासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, नंतर तिनं गर्भपात न करता गर्भाला वाढवण्याचा व प्रसूती करण्याचा निर्णय घेतला.

काय आहे नेमकं प्रकरण? : याचिकेवर सुनावणी करताना या प्रकरणात पीडितेवर झालेल्या अत्याचाराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याची दखल न्यायालयानं घेतली. पीडित मुलगी उपचारांसाठी केईएम रुग्णालयात दाखल होती. त्यामुळं न्यायालयानं जे.जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांना वैद्यकीय मंडळ तयार करुन या पीडित मुलीची तपासणी करण्याचे व त्याचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले होते.

पीडित मुलगी करणार लग्न :पीडित मुलीला जे.जे.च्या वैद्यकीय मंडळासमोर हजर राहण्याची सूचना करण्यात आली होती. त्याप्रमाणे जे.जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय मंडळाने मुलीची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीनंतर मुलीच्या पोटातील गर्भ व्यवस्थित असून कोणतीही वैद्यकीय समस्या नसल्याचा अहवाल वैद्यकीय मंडळाने सादर केला होता. मात्र, गर्भवती मुलगी ही कमी वयाची असल्याने ती सध्या गर्भाला जन्म देण्याच्या मानसिक स्थितीत असल्याबद्दल संशय व्यक्त केला होता. मात्र, मुलीचे आरोपीसोबत प्रेम संबंध असल्यानं तिला लग्न करायचं असल्याचं पीडित मुलीनं व तिच्या आईनं न्यायालयात सांगितलं. त्यानंतर गर्भपात करणे किंवा प्रसूती करणे या दोन्ही बाबींना खंडपीठानं परवानगी दिली.

हेही वाचा -

  1. रामगिरी महाराजांचे व्हिडिओ सोशल मीडियावरुन काढून टाका; उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश - Ramgiri Maharaj Controversial video
  2. यंदा गणेशोत्सवात 'पीओपी'च्या गणेश मूर्तींवर बंदी नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा मूर्तीकारांना दिलासा - POP Ganesh Murti Banned
  3. आयपीएल सामन्यांसाठी पोलीस सुरक्षा शुल्क माफ; मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारकडून मागवलं स्पष्टीकरण - IPL

ABOUT THE AUTHOR

...view details