मुंबई Ajinkya Rahane : आसाम आणि मुंबई यांच्यात सुरू असलेल्या रणजी सामन्या दरम्यान अजिंक्य रहाणेला त्याच्या 16 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत प्रथमच क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्यामुळं आऊट देण्यात आलं. मात्र, काही वेळानं आसाम संघानं आपलं अपील परत घेतल्यानंतर रहाणेनं पुन्हा फलंदाजी केली.
नेमकं काय घडलं : या सामन्यात मुंबईचा संघ चार गडी गमावून 102 धावांवर खेळत होता. तर रहाणेच्या वैयक्तिक 18 धावा झाल्या होत्या. यानंतर त्यानं चेंडू मिड-ऑनच्या दिशेनं मारुन एक धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा साथीदार शिवम दुबेनं धाव घेण्यास नकार दिला. रहाणे क्रिजपासून खूप पुढं आला होता. मिड-ऑनला क्षेत्ररक्क्षण कराणारा आसामचा कर्णधार दानिश दासनं चेंडू उचलून कीपरच्या दिशेनं फेकला पण हा चेंडू क्रीझवर परत येण्याचा प्रयत्न करणाऱ्या रहाणेला लागला. यानंतर आसामच्या सर्व खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल आऊटचं अपील केलं आणि मैदानावरील पंचांनी हे अपील मान्य केलं. या निर्णयानंतर लगेच पंचांनी चहापानाचा ब्रेक घेतला.
चहापानानंतर आसामनं अपील घेतलं मागे : रहाणेला पंचांनी बाद दिल्यामुळं आसामनं पहिल्या डावात केलेल्या 84 धावांना प्रत्युत्तर देताना मुंबईचे पाच फलंदाज केवळ 105 धावांवर बाद झाले. मात्र, चहापानाच्या वेळी आसामनं आपलं अपील मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि पंचांना याबाबत माहिती दिली. आयसीसीच्या नियमांनुसार, पुढील चेंडू टाकण्यापूर्वी बाद करण्याचं अपील मागे घ्यावं लागतं आणि पंचांनी ते अपील स्वीकारल्यानंतरच तो फलंदाज पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो. सुदैवानं अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर चहापानाचा ब्रेक घेण्यात आला आणि त्याच दरम्यान आसाम संघानं आपला निर्णय बदलला. त्यामुळं रहाणे 20 मिनिटांनी पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात आला. मात्र, अजिंक्य रहाणेला या जीवदानाचा फायदा उठवता आला नाही आणि केवळ चार धावा जोडल्यानंतर तो 22 धावांवर तो बाद झाला.
शार्दुल ठाकूरनं केली आसामची फलंदाजी उद्ध्वस्त :अजिंक्य रहाणे फलंदाजीला आला तेव्हा मुंबईचा संघ चार गडी गमावून 60 धावांवर खेळत होता. यानंतर रहाणेनं शिवम दुबेसोबत अर्धशतकी भागीदारी केली. रहाणेचा आतापर्यंतचा रणजी हंगाम निराशाजनक राहिला असून त्यानं आठ डावांत फक्त 16 च्या सरासरीनं केवळ 112 धावा केल्या आहेत. या सामन्यात आसामचा संघ पहिल्या डावात केवळ 84 धावांवर सर्वबाद झाला. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या शार्दुल ठाकूरनं 21 धावांत सहा बळी घेत आसामची संपूर्ण फलंदाजी उद्ध्वस्त केली.
हेही वाचा :
- IND vs ENG 3rd Test : तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांची दमदार सुरुवात; अर्ध्या तासात साहेबांचे दोन फलंदाज 'आऊट'
- राजकोट कसोटीत भारतीय संघाला मोठा धक्का; 500 बळी घेणाऱ्या अश्विननं अचानक सामन्यातून घेतली माघार
- माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या घरी चोरी, दोन नोकरांवर गुन्हा दाखल