Paralympics 2024 :पॅरिस ऑलिम्पिक 2024 नंतर पॅरालिम्पिक खेळांना काही दिवसांनी सुरूवात होणार आहे. पॅरालिम्पिक स्पर्धा 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत पॅरिसमध्ये होणार आहे. पण या पॅरालिम्पिक स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत यंदाच्या पॅरालिम्पिकमध्ये खेळणार नाही. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने मंगळवारी ही माहिती दिली.
18 महिन्यांसाठी निलंबित : प्रमोद भगत याला डोपिंगविरोधी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर 18 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने एका निवेदनात म्हटलं आहे की, "टोकियो 2020 पॅरालिम्पिक चॅम्पियन प्रमोद भगतला 18 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. तो पॅरिस 2024 पॅरालिम्पिक स्पर्धेत देखील सहभागी होणार नाही."
1 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाच्या (CAS) डोपिंग विरोधी विभागानं प्रमोद भगतला 12 महिन्यांच्या आत 3 वेळा योग्य माहिती न दिल्याबद्दल डोपिंग विरोधी नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळलं. त्यामुळे त्याच्यावर 18 महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. प्रमोदने या निर्णयाविरुद्ध CAS कडे अपील केलं होतं, परंतु CAS ने निर्णय कायम ठेवला आणि निलंबनाची पुष्टी केली.
प्रमोद भगतची कामगिरी : प्रमोद भगतने या वर्षाच्या सुरुवातीला थायलंडच्या पटाया येथे 2024 पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडच्या डॅनियल बेथेलला एका तगड्या लढतीत पराभूत करून पुरुष एकेरीच्या SL3 चं विजेतेपद कायम ठेवलं. 35 वर्षीय प्रमोदने एक तास 40 मिनिटं चाललेल्या या सामन्यात प्रतिस्पर्ध्याचा 14-21, 21-15, 21-15 असा पराभव केला. भगतचे हे चौथं एकेरीचं जागतिक विजेतेपद होतं. याआधी त्यानं 2015, 2019 आणि 2022 मध्ये तीन वेळा हेच पदक जिंकलंय. 2013 च्या जागतिक स्पर्धेत त्यानं पुरुष दुहेरीचे सुवर्णपदक पटकावलं होतं.
हेही वाचा
- सूर्यकुमार यादव मुंबईसाठी बुची बाबू टूर्नामेंट खेळणार - Shreyas Iyer
- मनू भाकर नीरज चोप्राशी लग्न करणार का? मनूच्या वडिलांनी स्पष्टच सांगितलं - Manu Neeraj Marriage
- 'बहाणे बनवण्यात सुवर्णपदक...', ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीवर गावस्कर संतापले - Paris Olympics 2024