चेन्नई CSK vs PBKS IPL 2024 : आयपीएल 2024 च्या स्पर्धेतील 49 वा सामना बुधवारी चेन्नई सुपर किंग आणि किंग्ज एलेवन संघात चेपॉकवर खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नई संघानं प्रथम फलंदाजी करत पंजाब संघाला 163 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पंजाब संघानं हे लक्ष्य तीन बळी गमावत पूर्ण करत चेन्नई संघाला विजयाचा जोरदार 'पंच' दिला. त्यामुळे चेन्नई संघाची डोकेदुखी वाढली आहे. चेन्नईकडून जोरदार फलंदाजी करणाऱ्या कर्णधार ऋतुराज गायकवाडचं अर्धशतक व्यर्थ गेलं.
पंजाब संघाला 163 धावांचं लक्ष्य :चेपॉकवर बुधवारी खेळवण्यात आलेल्या चेन्नई विरुद्ध पंजाब या सामन्यात चेन्नई संघानं प्रथम फलंदाजी केली. मात्र चेन्नईच्या फलंदाजांना फारसी समाधानकारक कामगिरी बजावता आली नाही. चेन्नईचे सलामीचे फलंदाज अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदार झाली. सलामीचे फलंदाज डाव सावरतील असं वाटत असतानाच हरप्रित ब्रारनं अजिंक्यला 29 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. त्याच षटकात फलंदाजीला आलेल्या शिवम दुबेला ब्रारनं भोपळाही फोडून न देता तंबूत परत पाठवलं. शिवम दुबे स्वस्तात बाद झाल्यानंतर जडेजालाही फार काही करत आलं नाही. त्याला राहुल चहरनं बाद करुन चेन्नईच्या संघाला सुरुंग लावला. केवळ सहा धावात चेन्नईचे 3 फलंदाज माघारी परतले. एकीकडे चेन्नईचे फलंदाज फक्त हजेरी लावत असताना कर्णधार ऋतुराज गायकवाडनं एकतर्फी किल्ला लढवला. त्यानं 48 चेंडूत 62 धावा ठोकल्या. यात त्यानं 5 चौकार आणि 2 षटकार मारले.
महेंद्रसिंग धोनी हंगामात पहिल्यांदाच झाला धावबाद :चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या जोरदार फलंदाजीच्या बळावर चेन्नई संघानं दीडशे धावा केल्या. त्याला समीर रिझवी आणि मोईन अलीनं चांगली साथ दिली. शेवटच्या टप्प्यात महेंद्रसिंग धोनीनं काही फटके खेळले. मात्र शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेताना तो धावबाद झाला. महेंद्रसिंग धोनी हा या हंगामात पहिल्यांदाच धावबाद झाला. त्यानं 11 चेंडूत 14 धावांचं योगदान दिलं. चेन्नई संघानं 7 बाद 162 धावा करुन पंजाब संघाला 163 धावांचं विजय लक्ष्य दिलं. पंजाब संघाकडून हरप्रित ब्रार आणि राहुल चहरनं प्रत्येकी दोन बळी मिळवले.