Scooter battery explodes : इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट; सात वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
वसईत चार्जिंगसाठी लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फ़ोट ( Electric scooter battery explosion) झाल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेत सात वर्षीय चिमुरड्याचा भाजल्याने दुर्दैवी मृत्यू ( Unfortunate death of a seven year old boy ) झाला आहे. शब्बीर शाहनवाज अन्सारी असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. वसई पूर्वेकडील रामदास नगर येथे राहणाऱ्या शाहनवाज अन्सारी यांनी 23 सप्टेंबर रोजी रात्री अडीच वाजण्याच्या दरम्याना आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी घराच्या हॉलमध्ये चार्ज करण्यासाठी ठेवली होती. मात्र पहाटे साडे पाचच्या सुमारास बॅटरीचा भीषण स्फोट झाला. त्यात हॉलमध्ये झोपलेले शाहनवाज यांचा सात वर्षाचा मुलगा शब्बीर आणि त्याची आई रुकसाना हे दोघे जखमी झाले. शब्बीर हा 70 ते 80 टक्के भाजल्याने त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असताना या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. स्कुटी कंपनीच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचा आरोप मृत बालकाच्या कुटुंबियांनी केला आहे.