VIDEO - धुळे जिल्ह्यात 13 मोरांचा विषबाधेतून मृत्यू
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात जैतपूर या गावातील शिवारात 13 मोरांचा मृत्यू झाला आहे. विषबाधेमुळे या मोरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात सात लांडोर, तर सहा मोरांचा समावेश आहे. अन्न व पाण्याच्या शोधात हे मोर सकाळी जंगलातून शेत शिवारात आले. याठिकाणी पेरणी केलेले; पण पावसाअभावी न उगवलेले, रासायनिक प्रक्रिया केलेले विषारी बियाणे मोरांनी खाल्ले. त्यामुळे मोरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एका मोराला वाचवण्याचा वन्यजीव संरक्षकांनी प्रयत्न केला. मात्र त्यातही अपयश आले. शिरपूर तालुक्यातील जंगल परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात मोरांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, 'जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडत नाही. जंगलात खाण्यासाठी अन्न व पिण्यासाठी पाणी नाही. परिणामी वन्यजीवांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे वन्यजीवांसाठी पाणी आणि अन्नाची व्यवस्था जंगलात करण्यात यावी', अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे.