VIDEO - मानवी साखळी करून नाला पार करणे बेतले जीवावर
यवतमाळ - उमरखेड तालुक्यातील निंगणूर या गावाजवळून वाहणाऱ्या मोठ्या नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात शेख कलीम शेख खाजा (32) हा शेतमजूर वाहून गेल्याची घटना उघडकीस आली. मराठवाड्यातील माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील शेख कलीम हा निंगणूर येथील दादाराव गव्हाळे यांच्या शेतात केळी तोडण्यासाठी मजुरीने आला होता. त्याला पोहायला येत नव्हते. त्यामुळे शेतातून परतताना नाल्याला आलेल्या पुरातून जाण्यासाठी त्याच्यासोबतच्या दोन मजुरांच्या हाताची साखळी करून नाला ओलांडण्याचा प्रयत्न त्याने केला. मात्र, मजुरांच्या हातातून हात सुटल्याने शेख कलीम हा पुराच्यापाण्यात वाहून गेला. ही घटना शुक्रवारी 23 जुलैला सायंकाळच्या सुमारास घडली. शेख कलीम हा हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील रहिवासी आहे. तो सध्या माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे राहत होता. प्रशासनाने शोधकार्य सुरु केले आहे. कलीमचा अद्याप पत्ता लागलेला नाही. शोधकार्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमला पाचारण करण्यात आले असल्याची माहिती उमरखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी दिली आहे.