राज्यात उद्यापासून लॉकडाऊन, मुख्यमंत्री करणार घोषणा - मुंबई कोरोना बातमी
मुंबई - आज (दि. 20 एप्रिल) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यामध्ये कडक टाळेबंदी लावण्यासंदर्भातचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता. राज्यामध्ये कडक टाळेबंदी लावण्यात यावी, अशी मागणी जवळजवळ सर्वच मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली. सध्या राज्यामध्ये 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लावण्यात आलेली आहे. मात्र, या संचारबंदीच गांभीर्य लोकांमध्ये नसल्याने रुग्ण संख्या काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा, ऑक्सिजनचा तुटवडा आणि रुग्णांचा वाढता मृत्यूदर पाहता राज्यात कडक टाळेबंदी लावण्यात यावी, अशी मागणी मंत्र्यांकडून करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील दुजोरा दिला गेला आहे. त्यामुळे लवकरच राज्यभरात कडक टाळेबंदीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.