ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा, यापूर्वीही अनेक संकटे पायी वारीवर आली - मुंबई बातमी
मुंबई - पंढरीची वारी आहे माझे घरी। आणिक न करी तीर्थव्रत।। पंढरपूर सर्व तीर्थक्षेत्रांचे माहेरघर. ही पंढरीची वारी केल्यानंतर इतर कोणत्याही तीर्थयात्रेला जाण्याची गरजच लागत नाही, असे संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात. मात्र, मागच्या वर्षी म्हणजे 2020 ला या वारीचे स्वरूप बदलले. कोरोनाच्या संकटामुळे पायी वारी झालीच नाही. संतांच्या पादुका एसटीने पंढरीला नेण्यात आल्या. यावर्षीही वारीवर कोरोनाचे सावट आहे. म्हणून प्रशासनाने यंदाही एसटी बसने संतांच्या पादुका नेण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. पंढरीची वारी नेमकी कधी सुरू झाली याविषयी ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र, या सोहळ्याला लाखो वारकरी पायी चालत पंढरीच्या दिशेने जात असतात. शतकानुशतके ही परंपरा सुरू आहे. इतिहासात या पायी वारी सोहळ्यावर अनेक आस्मानी-सुलतानी संकटे आली. मात्र, पायी पालखी सोहळा कधीच थांबला नाही.