Kolhapur Flood - लष्कर, एनडीआरएफच्या 6 तुकड्या दाखल; बचावकार्याला गती
कोल्हापूर - जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. पुरबाधित गावातील नागरिकांच्या बचावासाठी व त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी भारतीय लष्कर व भारतीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) एकूण 6 तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. बचावकार्याचे कामकाज युध्दपातळीवर सुरू आहे. एनडीआरएफचे प्रमुख ब्रिजेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली 4, यू.एस.प्रसाद 1 तर शिवप्रसाद राव यांच्या नेतृत्वाखाली 1 अशी एकूण 6 पथके अनुक्रमे करवीर तालुक्यातील आंबेवाडी, चिखली, हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी तर शिरोळ तालुक्यातल्या टाकळीवाडी व टाकळी या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. याचबरोबर भारतीय लष्कर दलाचे पथक प्रमुख मेजर एस.एस.बिस्ट यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यातील दत्तवाड, जुने व नवे दानवाड,राजापूर, खिद्रापूर, राजापूरवाडी, अकिवाट, बस्तवाड, मजरेवाडी, घोसरवाड, लाटवाडी, हेरवाड, कुरुंदवाड, तेरवाड, अब्दुललाट, शिरदवाड, शिवनाकवाडी आदी गावात लष्करामार्फत बचावकार्य मोहिम राबविण्यात येणार आहे. या बचावकार्यासाठी टाकळी येथील स्वराज्य ॲकॅडमी येथे लष्करी तळ उभारण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.