होत्याचं नव्हतं झालं, सरकारने आता कुठल्याही निकषाविना मदत करावी; पूरग्रस्त शेतकऱ्यांची मागणी - चाळीसगाव पूर परिस्थिती अपडेट
जळगाव - जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा या तीन तालुक्यांना 30 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर अतिवृष्टीचा जबर तडाखा बसला. तितूर आणि डोंगरी नद्यांना पूर आल्याने या तिन्ही तालुक्यातील 38 गावे पुराच्या पाण्यामुळे बाधित झाली असून, या गावांमध्ये घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. यात शेकडो जनावरांचीही हानी झाली आहे. सर्वात जास्त फटका हा चाळीसगाव तालुक्याला बसला आहे. येथील सुमारे 16 हजार हेक्टरवरील पिके वाहून गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. 'आमचं होत्याचं नव्हतं झालंय, सरकारने आता कोणतेही निकष न लावता मदतीचा हात द्यावा, कोकणातील पूरग्रस्तांना ज्या पद्धतीने तातडीने मदत मिळाली तशीच, मदत आम्हाला करावी', अशी मागणी चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली. दरम्यान, 'या संकटातून आम्ही उभेच राहू शकत नाहीत. सरकारने आम्हाला मदत केली नाही तर आम्हाला विष घेऊन आत्महत्या करण्यावाचून दुसरा पर्याय नाही', अशी उद्विग्नता देखील त्यांनी व्यक्त केली. चाळीसगाव तालुक्यातील वाकडी गावातून या साऱ्या परिस्थितीचा ईटीव्ही भारत प्रतिनिधी प्रशांत भदाणे यांनी घेतलेला आढावा.