यवतमाळ : नाल्याच्या पुरात 60 ते 70 गाई गेल्या वाहून
यवतमाळ : महागाव तालुक्यात काल (4 ऑक्टोबर) झालेल्या जोरदार पावसाने नाल्याला आलेल्या पुरात बेलदारी येथील 60 ते 70 गाई वाहून गेल्या. या घटनेने गो-पालकांवर संकट कोसळले आहे. ही घटना एका गावकऱ्याने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. यातील काही गाई बचवल्या आहेत. तर वाहत गेलेल्या गाईचा शोध सुरू आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल यवतमाळ जिल्ह्यातील काही भागाला पावसाने झोडपून काढले. महागाव तालुक्यातील बेलदारी येथील गाव तलाव ओव्हर फ्लो झाला. त्यामुळे या तलावातून वेगाने पाणी वाहत होते. काल संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान बेलदारीचा गुराखी आपली जनावरे गावाकडे घेऊन जात होता. यावेळी गावा शेजारच्या नाल्याला पाणी आले. गाई, गोरे हा नाला ओलांडत असताना त्यात वाहत गेल्या. पाण्याचा वेग एवढा होता की जनावरे अक्षरशः एका मागोमाग वाहत गेले. ही घटना गावकऱ्यांना माहीत होताच 40 च्यावर गाईंना वाचविण्यात आले. मात्र 35 च्यावर गाई व गोरे नागरिकांच्या डोळ्यादेखत वाहून गेले. या घटनेने गो-पालकांचे मोठे नुकसान झाले आहे.