CCTV Footage : ह्रदयद्रावक... पार्किंगमध्ये झोपवलेल्या चिमुरडीला कारने चिरडले, जागीच मृत्यू
हैदराबाद : बांधकाम कामगार असलेल्या एका आईने आपल्या बाळाला अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये झोपवले आणि कामावर गेली. त्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने झोपलेल्या बाळाकडे लक्ष न देता कार पार्किंगमध्ये नेली. गाडीचा पुढचा टायर झोपलेल्या बाळावर चढला आणि बाळाचे डोके फ्रॅक्चर होऊन जागीच मृत्यू झाला. हैदराबादमधील हयातनगरमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली.
कर्नाटकातील कलबुर्गी (गुलबर्गा) जिल्ह्यातील शाबाद येथील राजू आणि कविता यांना सात वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी आहे. उदरनिर्वाहासाठी ते हैदराबाद शहरात आले आणि बीएन रेड्डीनगरजवळील श्रीकृष्णनगर येथे राहिले. हयातनगरजवळील लेक्चरर्स कॉलनीतील बालाजी आर्केड अपार्टमेंटच्या शेजारी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत स्लॅबचे काम सुरू होते. बुधवारी दुपारी आई कविता यांनी त्यांच्यासोबत आलेल्या लक्ष्मी (३) या मुलीला झोपवले. तिने बाळाला शेजारच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये सावलीमध्ये ठेवले. नंतर ती बांधकामात गुंतली. दुसरीकडे त्याच अपार्टमेंटमध्ये राहणारे हरिरामकृष्ण हे बाहेरून कार घेऊन आले. त्यांना दिलेल्या पार्किंगच्या जागेत बाळ असल्याचे लक्षात न आल्याने त्यांनी कार पार्क करण्याचा प्रयत्न केला. यात कारच्या पुढील चाकाखाली आल्याने बाळाच्या डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर दुखापत झाली त्यात बाळाचा जागीच मृत्यू झाला.