leopards entered In village: बिबट्या आला रे आला! गावात घुसले तब्बल तीन बिबटे, पाहा व्हिडिओ - सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
सातारा: बिबट्यांचे दर्शन आणि नागरी वस्तीतील मुक्त संचार आता नवीन बाब राहिलेली नाही. पाळीव प्राण्यांवर हल्ले करणारा बिबट्या आता नागरीकांवर देखील हल्ले करू लागला आहे. नाशिकमधील बिबट्याच्या हल्ल्याची थरारक घटना ताजी असतानाच, आता साताऱ्यातील वराडे (ता. कराड) या महामार्गावरील गावात एकाचवेळी तीन बिबटे घुसले आहेत. तिन्ही बिबटे एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. गावात एन्ट्री करताच बिबट्यांनी एका पाळीव कुत्र्याचा फडशा पाडला. यामुळे वराडे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. वराडे गाव महामार्गाच्या लगत आहे. बिबट्याकडून माणसाचा अथवा महामार्गावरील वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बळी जाण्यापूर्वी वन विभागाने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वराडे ग्रामस्थांनी केली आहे. तसेच अलीकडच्या काळात मानवाने वन्यप्राण्यांच्या हद्दीत अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सहाजिकच वन्यप्राणीही शहरात दिसू लागले आहेत. त्यातून घडणाऱ्या घटनांमुळे मन सुन्न होत आहे. मुळात मानवी वस्तीत बिबट्या का येत आहे, याचाही विचार होणे गरजेचे आहे.