तीनही पक्षात जागा वाटपासंदर्भात समन्वय, महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून संजय राऊत स्पष्टच बोलले - lok Sabha Election
Published : Dec 30, 2023, 10:50 PM IST
मुंबई Sanjay Raut Reaction : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर जानेवारी महिन्यात अयोध्येतील भव्य राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 22 जानेवारीनंतर भाजपवाले श्रीराम यांना देखील उमेदवारी देऊ शकतात. सोबतच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडी जागा वाटपावरून चर्चा करत आहे. यात तीनही पक्षांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा आहेत. मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
तीनही पक्षात जागा वाटपासंदर्भात समन्वय :संजय राऊत म्हणाले की, वृत्तपत्रांमध्ये ज्या बातम्या येत आहेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपा संदर्भात, तो विषय मी अधिक स्पष्ट करतो. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्या विषयीच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत की, आमच्यात मतभेद आहेत. आमच्यामध्ये जागा वाटपावरून धूसफुस आहे. या सर्व अफवा आहेत. आमच्यात असे मतभेद अजिबात नाहीत. तीनही पक्षात जागा वाटपासंदर्भात समन्वय आहे. अफवांवर जाऊ नका 48 जागा महाराष्ट्रात आहेत. त्या जागांचे वाटप मेरिटनुसार होईल. हे आमचे सूत्र पहिल्यापासून आहे.