Sambhaji Bhide News: संभाजी भिडेंच्या नेतृत्वाखाली सांगलीत 'हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन' पदयात्रा, पाहा व्हिडिओ - सांगलीत संभाजी भिडे
सांगली : 'अखंड भारत'चा नारा घेऊन श्री 'शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान'च्या वतीने शहरात 'हिंदवी स्वराज स्वातंत्र्य दिन' पदयात्रा काढण्यात आली होती. 'शिवप्रतिष्ठान'चे संस्थापक संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पदयात्रेत भगवा ध्वज घेऊन हजारो धारकरी सहभागी झाले. शहरातल्या मारुती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून पदयात्रेला सुरुवात झाली. तत्पूर्वी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ढोल ताशांचा गजर करण्यात आला. प्रतिष्ठानच्या प्रेरणा मंत्राने या रॅलीचा शुभारंभ झाला. मारुती चौक, कापड पेठ, राजवाडा चौक, स्टेशन रोड, बदाम चौक, हिराबाग चौकमार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर या रॅलीची शिवप्रतिष्ठानच्या ध्येय मंत्राने सांगता झाली. रॅलीच्या शीर्षभागी भारत मातेचे पोस्टर आणि भगवा ध्वज घेऊन हजारो धारकरी सहभागी झाले होते. तिरंगा हा आमच्या हृदयात आहे, पण हजारो वर्षांपासून सनातन धर्माचा भगवा ध्वज आहे. अनेक नेत्यांनी घटनापिठाकडे भगवा ध्वज करावा, अशी सूचना केली आहे. त्यामुळे भविष्यात भगवा ध्वज होईल, अशी अपेक्षा आहे, असे मत धारकरी हणमंत पवार यांनी व्यक्त केले. दरम्यान 'शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान'च्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे जातीय तेढ अथवा आक्षेपार्ह विधान होणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबतची नोटीस बजावण्यात आली होती. विशेष म्हणजे रॅलीप्रसंगी संभाजी भिडे यांचे भाषण झाले नाही.