Shirdi Coin Issue: शिर्डीतील राष्ट्रीयकृत बँकेंची डोकेदुखी संपणार, नाण्यांच्या प्रश्नावर तोडगा निघाला- राहुल जाधव - राहुल जाधव
अहमदनगर :शिर्डी साईबाबा संस्थान बरोबरच शिर्डीतील राष्ट्रीयकृत बँकेंची डोकेदुखी ठरलेल्या नाण्यांचा प्रश्न आज अखेर मार्गी लागला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकचे अधिकारी तसेच शिर्डीतील राष्ट्रीयकृत बँकेंचे अधिकारी आणि साईबाबा संस्थानची महत्वाची बैठक 26 एप्रिल रोजी शिर्डीत पार पडली आहे. यात नाण्यांच्या प्रश्नावर तोडगा निघाला असल्याचे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले आहे. शिर्डी शहारतील सर्वच राष्ट्रीयकृत बँकांनी साई संस्थानच्या रोकड मोजदाद स्विकारण्यासाठी असमर्थता दर्शवली होती. त्यानंतर साई संस्थानने थेट भारतीय रिझर्व्ह बँकेशीच संपर्क करुन यात मार्ग काढण्याची विनंती केली होती. आज अखेर आरबीआयचे बेलापूर शाखेचे जनरल मॅनेजर मनोज रंजन दास यांनी शिर्डीत येवुन साईसंस्थान आणि शिर्डीतील तेरा राष्ट्रीयकृत बँकासोबत महत्वाची बैठक घेतली आहे. संयुक्तरित्या पार पडलेल्या या बैठकीत नाण्यांवर तोडगा निघाला आहे. ज्या भागात नाण्यांचा तुडवडा आहे. त्या भागात शिर्डीतील राष्ट्रीयकृत बँकेत पडून असलेली कोट्यावधी रुपयांची नाणी वितरित केली जाणार आहे. यामुळे शिर्डीतील बँकाचा नाण्यांचा बोजा कमी होणार आहे. जागा रिकामी होणार असल्याने त्या बॅंकानी आता साई संस्थानची दान रक्कम स्विकारण्यासाठी तयार दर्शवली असल्याचे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले आहे.