Replica Of Largest Buddha In Pune: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यात साकारली बुद्धाची प्रतिकृती
पुणे:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यात विविध ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येत आहे. तसेच पुण्यातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी लाखो भाविकांच्यावतीने अभिवादन करण्यात येत आहे. चायना येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या 'नेशन जायंट बुध्दा' या मूर्तीची पुण्यातील दांडेकर पुल येथे प्रतिकृती बनविण्यात आली आहे. ती प्रतिकृती बघण्यासाठी तसेच बाबासाहेबांनी अभिवादन करण्यासाठी बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने गर्दी करत आहे.
संतोष संगर यांनी साकारली प्रतिकृती: पुण्यातील दांडेकर पुल येथील अजिंक्य भीम ज्योत सेवा संघ येथे कलाकार संतोष संगर यांच्यावतीने 42 फुट उंच, 60 फूट लांब आणि 55 फुटी रुंद असलेली ही 'नेशन जायंट बुध्दा' या मूर्तीची प्रतिकृती बनविण्यात आली आहे. गेल्या 1 महिन्यांपासून यासाठी जोरदार तयारी करण्यात येत असून शेवटी ही प्रतिकृती तयार करण्यात आली.