Raju Shetti On Barsu : बारसूमध्ये पोलीस चोऱ्या करायला गेले होते का? राजू शेट्टींचा संतप्त सवाल - Barsu Refinery Project
सोलापूर:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी बारसु आंदोलनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शनिवारी सकाळी राजू शेट्टी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे राजू शेट्टींनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले.बारसु प्रकल्पाला विरोध करण्यासाठी जमलेल्या शेतकऱ्यांवर बेछूट लाठीमार करण्यात आला.महिलांवर लाठीमार करण्यात आला, तसेच बेशुद्ध झालेल्या महिलांवरील दागिने पोलिसांनी काढून घेतले.पोलिसांनी महिलांवर देखील हल्ला केला, एका महिलेचे मोबाईल घेतले, एका महिलेच्या कानातील काढून घेतले.पोलीस तिथे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवायला गेले होते की, चोऱ्या करायला गेले होते? असा संतप्त सवाल माजी खासदार राजू शेट्टींनी उपस्थित केला आहे. तसेच बारसू मध्ये जे काही सुरु आहे त्याबाबतीत गृहमंत्र्यांनी स्वतः समोर येऊन स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. पोलिसांची ही दंडेलशाही कशासाठी? कोणाची सुपारी घेतलीय?का असे प्रश्न राजू शेट्टीनी उपस्थित केले आहे. कोकणातील बारसु हे माझ्या मतदार संघाच्या अगदी जवळच आहे.त्यामुळे भूमिका घेतलीय की आता आम्ही बारसुला जाणार, ते शेतकरी एकटे नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी व आम्ही बारसुतील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत असे राजू शेट्टीनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.