Raju Shetti Protest March : मराठा आंदोलनामुळं स्थगित झालेल्या 'आक्रोश' पदयात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात
Published : Nov 3, 2023, 2:22 PM IST
कोल्हापूर Raju Shetti Protest March : गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला प्रतिटन चारशे रुपयांचा हप्ता देण्याच्या मागणीबाबत साखर कारखाने आणि शेतकरी संघटनांची गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली दुसरीही बैठक निष्फळ ठरली. त्यानंतर आक्रमक होत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आजपासून (3 नोव्हेंबर) पुन्हा आक्रोश पदयात्रेला सुरुवात केली आहे. दरम्यान, राज्यभरात मराठा आरक्षणाचा भडका उडाल्यानंतर राजू शेट्टी यांनी ही पदयात्रा स्थगित केली होती. तसंच चर्चेतून मार्ग काढण्यासाठी गुरुवारी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार आणि स्वाभिमानीची बैठकही झाली. मात्र या बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नाही. दुसऱ्या हप्त्यासाठीची ही दुसरी संयुक्त बैठक निष्फळ ठरली. यानंतर राजू शेट्टी यांनी साखर कारखानदाराकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळं आता पुन्हा एकदा पदयात्रा सुरू करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आज सांगली जिल्ह्यातील राजारामबापू साखर कारखान्यापासून या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.