Mahatma Phule Jayanti: महात्मा फुले जयंती निमित्त रांगोळीच्या माध्यमातून उलगडला जीवनपट - ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर रांगोळ्या
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित 25 प्रसंगाच्या रांगोळ्या तरुणांनी रेखाटल्या. महात्मा फुले यांच्या 196 व्या जयंतीनिमित्त हा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये 25 स्पर्धकांनी रांगोळी काढून सामाजिक संदेश दिला तर 40 जणांनी रक्तदान केले.
25 कलाकारांच्या 25 कलाकृती: महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाची दारे खुली केली. त्यांचे कार्य आजच्या पिढीला अनुभवता यावे याकरिता महात्मा फुले इतर मागास बहुजन विभाग, महाज्योती आणि इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक उपसंचालक यांच्या वतीने आगळीवेगळी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर असलेले प्रसंग रांगोळी रुपात रेखाटण्यात आले. 25 कलाकारांनी 25 वेगवेगळ्या चित्र रेखा साकारत त्यांचा जीवनपट मांडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये चार चौरस फुटांच्या जागेवर युवकांनी रांगोळी रेखाटली. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल मुलींनी देखील रांगोळ्या रेखाटून त्यांच्या कामाला उजाळा दिला. सत्यशोधक एक दिवा ज्ञानाचा, सत्यशोधक क्रांतीसुर्य, समाज सुधारक, फुले सावित्री व्हा, असे वेगवेगळे संदेश रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आले. मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक शेख जलील, विद्या दाभाडे, सीमा सिंधीकर, एस एस दडपे यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली होती.
रक्तदान करून सामाजिक कार्य: पीएस अभियांत्रिकी महाविद्यालयात खासगी ब्लड बँकेच्या सहकार्यातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात 39 दात्यांनी रक्तदान करत सामाजिक उपक्रमाला योगदान दिले. दिवसभरात विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनी औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ येऊन पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
हेही वाचा: Mahavikas Aghadi : काँग्रेसला महाविकास आघाडीत दुय्यम स्थान?