Budget Session 2023: शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक; सत्ताधाऱ्याच्या विरोधात घोषणाबाजी - Budget Session
मुंबई:2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्याच्या विरोधात घोषणाबाजी करत विरोधकांनी हल्लाबोल केला. मागच्या तीन आठवडे विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सतत सरकारवर आसूड ओढत आहेत. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप झालेले नसल्याने सुद्धा विरोधक आक्रमक झाले आहेत. याआधीही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याचा आज शेवटच्या दिवशीही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले होते. शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, यासाठी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला होता. आजही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा करत विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकजुटले. या अगोदर देखील विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले होते.