Navratri 2023 : मानाच्या तोफेच्या सलामीनं करवीर निवासिनी अंबाबाईच्या शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ - करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी
Published : Oct 15, 2023, 12:17 PM IST
कोल्हापूर : Navratri 2023 करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास आजपासून विधिवत प्रारंभ झाला. मंदिरात तोफेची सलामी देण्यात आल्यानंतर घटस्थापना करण्यात आली. घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी आई अंबाबाईची पारंपारिक बैठकी पूजा साकारण्यात आली. दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची लांबलचक रांगा लागल्या होत्या. मंदिरात आदिशक्तीच्या जागराला खऱ्या अर्थाने आजपासून सुरवात झाली. महाराष्ट्र, आंध्र कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आजपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. दुपारी दीड वाजेपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त असल्याने पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने मंदिर परिसरात बॅरिकेट्स लावून दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत. मंदिरात मानाची तोफ घडल्यानंतर घटस्थापना करण्यात आली. नवरात्रोत्सव काळात नित्यक्रमाप्रमाणेच अंबाबाई देवीला तीन वेळा अभिषेक आणि पाच वेळ आरती केली जाते. तर दररोज रात्री उशिरा देवीची पालखी मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करते, दुपारी बारा वाजता मध्यान्ह अभिषेक झाल्यानंतर देवीची सालंकृत पूजा बांधण्यात येते, रोज वेगवेगळ्या रूपात देवीची पूजा पाहण्यासाठी भाविक मंदिरात गर्दी करतात.