Mumbai Rain: मालाडमध्ये ओढ्याच्या पुरात तरुण वाहून गेला, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल - पुराच्या पाण्यात पडला
मुंबई :राज्यातपावसाचे थैमान मांडले आहे. पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी देखील ओलांडली आहे. बऱ्याच ठिकाणी पूरग्रस्त स्थिती देखील निर्माण झाली आहे. नॅशनल पार्कमध्ये अशीच एक घटना घडली. ओढ्याच्या पुरात एक तरुण वाहून गेला आहे. तो मित्रांसोबत फिरण्यासाठी गेला होता. चंदन दिलीप शाहा (वय २५ वर्ष) असे पुरात वाहुन गेलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना 18 जुलै रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सलग दोन दिवस शोध घेऊनही अजून मृतदेह सापडला नाही. मिळालेले माहितीनुसार, बारीक पायरी क्रांतीनगर भागातील एक तरुण आपल्या मित्रांसोबत नॅशनल पार्कमधील डोंगराळ भागात फिरण्यासाठी गेला होता. मात्र ओढा ओलांडत असताना त्याचा पाय घसरला. तो पुराच्या पाण्यात पडला आणि वाहून गेला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंबई अग्निशामक दलाच्या जवानांनी स्थानिक पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अँकर हुक आणि दोरीच्या मदतीने या तरुणाला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, मुसळधार पाऊस आणि अंधार पडल्यामुळे आता ही शोध मोहीम थांबवण्यात आली आहे.