Maratha Reservation Protest : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यापासून आमच्या जीवितास धोका, मराठा आंदोलकांचा आरोप - गावात प्रवेश बंदीचे बॅनर
Published : Nov 14, 2023, 4:11 PM IST
जालना Maratha Reservation Protest : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे आमदार पुत्र संतोष दानवे यांच्यापासून आम्हाला धोका असल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केलाय. मराठा आंदोलकांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांच्यावर आरोप केल्यानं खळबळ उडाली आहे. भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर इथल्या गावकऱ्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत पुढार्यांना गावात प्रवेश बंदीचे बॅनर लावलं होतं. हे बॅनर गावातीलच काही तरुणांनी फाडले. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठा आंदोलकांना या तरुणांनी बेदम मारहाण केली होती. यावेळी त्यांना उपस्थित नागरिकांनी शासकीय रुग्णालय भोकरदन इथं उपचारासाठी दाखल केलं. त्यांना सोमवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. रुग्णालयाच्या गेटवर भोकरदन बस स्थानकासमोर त्यांना काही तरुणांना आडवत एका भाजपा कार्यकर्त्याच्या घरी नेत त्यांच्यावर दबाव टाकून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आमच्या जीविताचं भविष्यात कधीही काही झाल्यास त्याला मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे जबाबदार राहतील, असं मराठा आंदोलकांनी यावेळी सांगितलं. या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अद्यापही भोकरदन पोलिसांनी अटक केली नाहीत. त्यांना त्वरित अटक करण्याची मागणीसुद्धा या जखमी मराठा आंदोलकांनी केली आहे. याबाबत आमदार संतोष दानवे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.