Maharashtra Political Crisis : अजित पवार गद्दार...शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे दिल्लीत लागले बॅनर - शरद पवार यांच्या पाठीत खंजीर
नवी दिल्ली :राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. बुधवारी दोन्ही गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करुन चांगलीच राळ उडवून दिली. त्यातच आज शरद पवार दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ( NCP Executive Committee Meeting) घेत आहेत. मात्र बैठकीच्या अगोदरच शरद पवार यांच्या समर्थनार्थ दिल्लीत बाहुबली चित्रपटातील कटप्पाने बाहुबलीच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे बॅनर लागले आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ हे बॅनर लावण्यात आले आहेत. शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे चित्र या बॅनरवर रंगवून अजित पवार यांच्या हातात खंजीर दाखवण्यात आला आहे. या बॅनरवर सारा देश देख रहा है, अपनो मे छुपे गद्दारो को, माफ नही करेगी जनता, ऐसे झुठे मक्कारो को, असे लिहिन्यात आले आहे. मात्र हे बॅनर लागल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे बॅनर गुंडाळून नेले आहेत.