"ठाण्याचा विकास मोदींमुळं रखडला", 'ईटीव्ही भारत'च्या निवडणूक चर्चासत्रात विरोधकांचा आरोप - लोकसभा निवडणूक २०२४
Published : Jan 2, 2024, 7:06 PM IST
|Updated : Jan 2, 2024, 7:37 PM IST
मुंबई/ठाणे Thane Lok Sabha :आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, 'ईटीव्ही भारत'ने आयोजित केलेल्या चर्चासत्रात ठाणे जिल्ह्यातील प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार आनंद परांजपे, भारतीय जनता पार्टीकडून प्रवक्त्या मृणाल पेंडसे, शिवसेना शिंदे गटाकडून प्रवक्ते अरुण सावंत आणि शिवसेना ठाकरे गटाकडून प्रवक्ते तुषार रसाळ यांनी भाग घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे : "ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांचा जनसंपर्क चांगला आहे. मात्र, ज्या पद्धतीनं या मतदारसंघाचा विकास होणं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं विकास झाला नाही. मतदार संघातील अनेक कामांचा केंद्राकडे पाठपुरावा करण्यात राजन विचारे कमी पडले", अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी केली.
ठाकरे गटाचे प्रवक्ते तुषार रसाळ : याला उत्तर देताना, "राजन विचारे यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये जास्तीत जास्त विकास कामांवर भर दिला. रेल्वेच्या प्रश्नाबाबत त्यांनी ४२ प्रश्न संसदेत उपस्थित केले", असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते तुषार रसाळ यांनी केला. "गेल्या दहा वर्षांमध्ये रेल्वेची जितकी कामं झाली तितकी यापूर्वी कधीच झाली नव्हती. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघांमध्ये अनेक कामं रखडली आहेत", असा आरोप रसाळ यांनी केला.
भाजपा प्रवक्त्या मृणाल पेंडसे : त्यांच्या या आरोपांना भाजपाच्या प्रवक्त्या मृणाल पेंडसे यांनी उत्तर दिलं. "पंतप्रधान मोदी विकासासाठी निधी देताना खासदार कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार करत नाहीत. खासदार राजन विचारे कामामध्ये कुठेतरी कमी पडले म्हणूनच अशा पद्धतीचा आरोप केला जातोय. विचारे पंतप्रधान मोदींच्या नावावरच निवडून आले आहेत", असा हल्लाबोल त्यांनी केला.
शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत :"ठाण्याच्या विकासामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा हात आहे. रस्त्यांची विविध कामं मुख्यमंत्र्यांनी हाती घेतली. तसेच मेट्रो आणि अन्य प्रकल्पाच्या विकासासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले", असं शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत म्हणाले. "विरोधकांनी कितीही आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तरी जनतेला हे दिसतं. महायुतीच्या पाठीशी जनता ठामपणे उभी आहे", असं सावंत यांनी यावेळी सांगितलं.