Wresters Protest : जंतरमंतरवरील कुस्तीपटुंचे आंदोलन चिरडल्यानंतर कुस्तीपंढरीत उमटल्या संतप्त प्रतिक्रिया, तीव्र आंदोलन छेडण्याचा पैलवानांचा इशारा - कोल्हापूर कुस्तीपटू दिल्ली आंदोलन पाठिंबा
कोल्हापूर: राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या एक महिन्यांपासून ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. कुस्तीपटूंना नव्या संसद भवनाच्या उद्घाटनच्या कार्यक्रम सुरू असताना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलन स्थळी पैलवान आणि दिल्ली पोलीस यांच्यात धक्काबुक्की झाली. या घटनेनंतर कुस्ती पंढरी असलेल्या कोल्हापुरात नाराजीचा सूर उमटला आहे. कुस्तीचा सराव करणाऱ्या अनेक पैलवानांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
पैलवान संग्राम कांबळे म्हणाले, की ज्या पैलवानांनी देशाला ऑलम्पिकचे मेडल मिळून दिले, त्या आपल्या देशाच्या आंतरराष्ट्रीय महिला व पुरुष पैलवानांना ही वागणूक मिळत आहे. तेही वादग्रस्त असलेल्या खासदारांसाठी तर ही संपूर्ण क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत शरमेची आणि निंदनीय गोष्ट आहे. ब्रिजभूषण या खासदाराला वाचवण्यासाठी त्याची चूक लपवण्यासाठी, साम-दाम-दंड-भेदाचा वापर या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पैलवानांवर केला जात आहे, यामुळे क्रीडाक्षेत्र काळवंडले जाणार आहे.
देशाला ऑलम्पिकमध्ये पदक मिळवून देणाऱ्या पैलवानांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा तालीम संघाच्या वतीने 5 मे रोजी कोल्हापुरातील पापाची तिकटी येथे निदर्शने करून कोल्हापुरातील पैलवानांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. दिल्लीत काल झालेल्या प्रकारानंतर लवकरात लवकर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोल्हापुरातील पैलवानांनी दिला आहे.