५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचं राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
Published : Dec 26, 2023, 9:34 PM IST
पुणे : 50 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान प्रदर्शनाचं राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. देशभरातील विविध संस्था, विद्यार्थ्यांच्या सहभागातून, हे केवळ विज्ञान प्रदर्शन नसून विज्ञानाचा उत्सव बनले आहे. या प्रदर्शनाला अनेक विद्यार्थी भेट देणार असल्यानं वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल, असा विश्वास बैस यांनी यावेळी व्यक्त केला. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नियमित शिक्षण घेताना विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आल्याचं राज्यपाल बैस यांनी सांगितलं. हे प्रदर्शन विद्यार्थी आणि बाल वैज्ञानिकांच्या सर्जनशीलतेला चालना देतं. विद्यार्थ्यांच्या नवनवीन शोधांना वाव देण्यासाठी शाळांनी अशा प्रदर्शनांचं आयोजन करावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे प्रचंड इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राष्ट्रपती पदावर पोहोचले. प्रत्येक व्यक्तीमध्ये असा गुण असतो आणि तो इच्छाशक्तीतून बाहेर पडतो. बाल वैज्ञानिकांच्या या प्रदर्शनातून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार होतील, त्यांच्या वैज्ञानिक आविष्कारांच्या माध्यमातून नवीन पेटंटची नोंदणी होईल. तसंच बालशास्त्रज्ञ राष्ट्राच्या वैज्ञानिक प्रगतीला हातभार लावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.