Gram Panchayat Election 2023 : मावळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुमाकूळ, 4 ग्रामपंचायत बिनविरोध तर 15 साठी मतदानाला सुरुवात; पाहा व्हिडिओ - पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका
Published : Nov 5, 2023, 2:05 PM IST
पुणे Gram Panchayat Election 2023 : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात जाहीर झालेल्या 19 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांपैकी चार ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळं उर्वरित 10 ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूका आणि पोटनिवडणुकांसाठी आज (5 नोव्हेंबर) सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 6 ऑक्टोबर रोजी मावळ तहसीलदार यांनी निवडणुकीबाबत अधिसूचना जारी केली होती. यापैकी सार्वत्रिक निवडणुका असलेल्या 19 ग्रामपंचायतीपैकी 4 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने व पोटनिवडणुका असलेल्या 10 ग्रामपंचायतींपैकी 5 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानं आज एकूण 19 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यात शिळींब, कोंडिवडे (आं.मा.), उधेवाडी, मळवंडी ढोरे, सांगिसे, मुंढावरे, दिवड या गावांत सरपंच पदासाठी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. तसेच या एकूण 15 ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या एकूण 117 जागांपैकी 37 जागा बिनविरोध आल्या आहेत. त्यामुळं उर्वरित 79 सदस्य पदांच्या जागांसाठी 165 उमेदवार रिंगणात आहेत. सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार असल्याने बहुतांश गावात ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही ग्रामपंचायत निवडणुकीमध्येदेखील मोठी चुरस निर्माण झाली आहे.