Pune Fire News : वाघोली येथील गोडाऊनला आग, लाखो रुपयांच्या डेअरी उत्पादनांची राख - गोडाऊनला आग लागली
पुणे : पुणे शहरात आग लागण्याचे सत्र काही थांबताना दिसत नाही. गेल्या चार ते पाच दिवसातील ही तिसरी घटना आहे. पुणे जिल्ह्यातील वाघोली परिसरात असलेल्या पुणे-अहमदनगर रस्त्यावरील एका गोदामाला बुधवारी आग लागल्याची घटना घडली. सकाळी 4 वाजता गोदामाला आग लागल्याची माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन विभागाने दिली. दरम्यान दोन अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
बुधवारी पहाटे 4 वाजता डेअरी पदार्थांच्या गोदामाला आग लागली होती. आग लागल्याची माहिती अग्निशमन दला मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी त्वरीत दाखल झाल्या. अग्शिमन दलाच्या दोन वाहनांनी आग आटोक्यात आणली आहे. या गोदामात डेअरी पदार्थांची साठवणूक करण्यात आली होती. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानुसार, गोदामात चीज, दूध, बटर क्रीम, यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचा साठा होता. दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणतीही व्यक्ती जखमी झालेले नाही. पण या आगीत लाखो रुपयांचा माल आणि पिकअप टेम्पोचे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या महिन्याच्या सुरुवातीला पुण्यातील वाघोली परिसरातील सजावट साहित्याच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली होती. यात तीन जणांचा मृत्यू झाला होता.