Watch Video : शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या चारीच्या गेटचे कुलूप तोडत सोडले शेतीसाठी पाणी - कोपरगाव
अहमदनगर (शिर्डी) : कोपरगाव तालुक्यासह परिसरात पावसाने ओढ दिल्याने, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत गोदावरी कालव्यातून खाली पाणी वाहून जात असताना स्वतःला आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. गोदावरी कालव्यांना पाणी सोडण्यात आले. मात्र वरच्या वितरकांना पाणी सोडले जात नाही. पावसाने दडी मारल्याने सगळ्याच पिकांना पाण्याची गरज असल्याने, पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र, पाटबंधारे खात्याने पाणी सोडण्यास असमर्थता दर्शविल्याने, शेतकऱ्यांनी वितरीकेचे कुलूप तोडून पाणी सोडले आहे. कोपरगाव तालुक्यात कमी पाऊस झाल्याने शेतपिकांचे नुकसान होत आहे. तर पाण्याअभावी शेतकऱ्यांनी पशुधन वाचवायचा कसा हा देखील मोठा प्रश्न आहे. ही सर्व परिस्थिती पाहता संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी तालुक्यातील टाकळी शिवरातील गोदावरी डाव्या कालव्याच्या गेट जवळ धरणे आंदोलन करत ठीया मांडला, पाटबंधारे विभागाने 7 चारीला पाणी सोडले नाही तर कुलूप तोडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. अखेर सकाळपासून बसलेल्या शेतकऱ्यांना पाटबंधारे अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सात नंबर चारी वरील गेटचे कुलूप तोडले. तसेच 7 नंबर चारीला पाणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शेतकरी आंदोलन करुन परतल्यानंतर पाटबंधारे अधिकाऱ्यांनी पुन्हा गेट बंद करत कुलुप लावले असून गेटचे कुलूप तोडणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.