Irshalwadi landslide Incident : इर्शाळवाडीत घडलेली घटना दुर्दैवी, मंत्री दीपक केसरकर
अहमदनगर : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत घडलेली घटना दुर्दैवी आहे. अनेकजण अडकले आहेत. गेलेली माणसे परत येऊ शकत नाहीत. मात्र ज्यांना वाचवता येईल त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जुलै महिन्यात बऱ्याच लोकांचे वाढदिवस असतात. मात्र या घटनेमुळे वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. उलट या दुर्घटनेत जी मुले पोरकी झाली आहेत. त्यातील मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पुढचे आयुष्य कसे सुरळीत होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले. मंत्री दीपक केसरकर आज सहकुटुंब शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. साईबाबांच्या समाधीच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले की, पावसाळ्यात डोंगरावर मोठा पाऊस होतो. अशा दुर्घटना घडतात. त्यामुळे पावसाळ्यात धोकादायक ठिकाणाच्या लोकांना दुसरीकडे शिफ्ट करणे गरजेचे आहे. सर्वांच्या आरोग्यसाठी साईबाबांचा चरणी प्रार्थना केल्याचही मंत्री दिपक केसरकर म्हणाले आहे. अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.