मंत्रिमंडळ विस्तारानंतर लवकरच जिल्हानिहाय पालकमंत्रीपदाचे वितरण होईल - देवेंद्र फडणवीस
नागपूर : मंत्रिमंडळ विस्तारानंतर लवकरच जिल्हानिहाय पालकमंत्रीपदाचे वितरण देखील होईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज नागपूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हानिहाय पालकमंत्रीपदाचे वितरण एवढा काही मोठा मुद्दा नाही. आम्ही ते सोप्यारीत्याने लवकरच करू,अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. खाते वाटप जसे सोप्यारीतीने झाले, तसेच आमची सर्व कामे ही सोप्यारीतीने होणार असल्याचं ते म्हणाले. तीनही पक्षांनी आता हे ठरवले आहे की, एकत्रितपणे महाराष्ट्राच्या हितासाठी काम करायचे आहे. म्हणून मला नाही वाटत की त्याच्यात काही वाद होतील. महाविकास आघाडीला जसे तडे गेले आहेत तशीच अवस्था महायुतीची होऊ नये आणि त्याचा परिणाम सरकारवर होऊ नये, यासाठी कोणती नवीन व्यवस्था करण्यात आली आहे का असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, सरकारने कुठलीही नवीन व्यवस्था निर्माण केलेली नाही. सर्व काही जुनीच व्यवस्था आहे. पुढील मंत्रिमंडळ विस्तारही होईल. विरोधी पक्षनेत्यासंदर्भातला निर्णय विधानसभा अध्यक्ष ठरवतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.