pune congress protest: पुण्यात मणिपूर घटनेवरून काँग्रेसचे आंदोलन; यांचा केला निषेध - मनिपूर घटनेवरून काँग्रेसचे आंदोलन
पुणे : मणिपूर मधील हिंसाचार प्रकरणावरून देशभर आंदोलन होत असून, काँग्रेस पक्ष देखील आक्रमक झाला आहे. पुण्यात काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी हिंसाचार घटनेचा आणि केंद्र सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा निषेध करण्यात आला. पुण्यातील तुळशीबाग येथील जिलब्या मारुती चौकामध्ये काँग्रेसच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, गेल्या तीन महिन्यापासून मणिपूर हे जळत आहे. राहुल गांधी हे सातत्याने मणिपूरकडे लक्ष द्या असे सांगत असताना, देशाचे पंतप्रधान मात्र परदेशात फिरून मोज मजा करत होते. मणिपूरमधील प्रत्येक महिला आता प्रत्येक राजकारणाला शिव्या देत असून, पंतप्रधान मोदी यांच्याकडे थोडा जरी आत्मक्लेष असला तर त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मणिपूरमधल्या जाती जातीमध्ये भांडण लावून, राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. तीन महिन्यापूर्वी सुद्धा तुम्हाला तिथला मुख्यमंत्री बदलला असता तर चालले असते. परंतु तसे न करता मणिपूर जळत ठेवायचे. त्याचा राजकीय फायदा घ्यायचा, असे कृत्य पंतप्रधानाकडून केले गेले. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी यावेळी दिली आहे. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते, महिला, विविध पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.