Birthday Gift Tomato: भावाने बहिणीच्या वाढदिवसाला दिले टोमॅटो भेट; अनोख्या भेटवस्तूमुळे चर्चा - Brother gifted tomatoes on sister birthday
ठाणे : बाजारातून गायब झालेले टोमॅटो बहिणीच्या वाढदिवसाला भेट देत वाढदिवस साजरा केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण शहरात घडली. विशेष म्हणजे, भावासोबतच मामा आणि मावशीने महिलेला टोमॅटो भेट दिल्याने शहरात चर्चेचा विषय बनला आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये टोमॅटोचा भाव १५० रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी जे टोमॅटो २० रुपये किलोने मिळत होते त्याने आता १५० रुपयांचा आकडा पार केला आहे. महाराष्ट्रातील नाशिक, जुन्नर, पुणे येथून टोमॅटोची मोठ्या प्रमाणात विक्री होत असताना, काही दिवसांतच अवकाळी पाऊस व राजस्थान बीपर जॉय या चक्रीवादळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे यंदा टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असून मागणी वाढल्याने टोमॅटो मार्केटमधून गायब झाले आहेत. त्यातच टोमॅटो मार्केटमध्ये मिळत नसल्याने गृहिणींमध्ये नाराजी दिसत आहे. कल्याण कोचडी परिसरात राहणाऱ्या सोनल बोरसे या महिलेचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला होता. या वाढदिवसानिमित्त तिने आपल्या सगळ्या नातेवाईकांना पार्टीसाठी घरी आमंत्रण दिले होते. या पार्टीत सोनम यांचा भाऊ गौतम वाघ त्याने व त्यांच्या नातेवाईकांनी तिला वाढदिवसानिमित्त चक्क टोमॅटो गिफ्ट दिले. अचानक मार्केटमधून गायब झालेले टोमॅटो घरी पाहून ती आनंदित झाली. वाढदिवसानिमित्त सगळ्यात अनोखे व सगळ्यात महागडे गिफ्ट असल्याचे तिने सांगत आनंद व्यक्त केला. तर दुसरीकडे भावाने व नातेवाईकांनी टोमॅटो गिफ्ट दिल्याची बातमी पूर्ण शहरात पसरल्याने तिचा वाढदिवस हा चर्चेचा विषय बनलेला आहे.