Baipan Bhari Deva : मराठीत चित्रपट बनतात, प्रोजेक्ट नाही - केदार शिंदे
मुंबई - 'बाईपण भारी देवा' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अभूतपूर्व गर्दी थिएटरवर येताना दिसते. प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खऱ्या अर्थाने खेचून आणण्यात चित्रपटाला यश मिळाले आहे. बॉक्स ऑफिसवर तर चित्रपटाने कमाल करुन दाखवत ५० कोटींचा आकडा पार केला आहे. 'सैराट', 'वेड' या चित्रपटानंतर जबरदस्त कमाई करणारा 'बाईपण भारी देवा' हा तिसरा चित्रपट ठरला आहे. या यशानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांचे कौतुक होत आहे. अलिकडेच चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर शिंदे यांनी हा चित्रपट आता लोकांचा बनल्याचे म्हटले होते. केदार शिंदेंच्या कारकिर्दीकडे पाहिले तर त्यांनी तुलनेने हिट चित्रपट दिले आहेत. 'अगं बाई अरेच्चा' पासून सुरुवात करत 'जत्रा' ते अलिकडेच रिलीज झालेल्या 'महाराष्ट्र शाहीरपर्यंत' त्यांचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांची नस पकडणारा होता. सुंदर कथा, श्रवणीय संगीत, उत्तम कलाकाकांचा संच आणि वास्तववादी दिग्दर्शन यामुळे मराठी चित्रपटाला त्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवले आहे.
'बाईपण भारी देवा'च्या यशानंतर त्यांना हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपट याविषयी विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी नेमक्या शब्दात मराठी चित्रपट हिंदी चित्रपटाहून कसा वेगळा आहे हे सांगितले. केदार शिंदे म्हणाले, 'मराठीमध्ये साहित्याला खूप महत्त्व आणि वजन आहे. लिहिलं चांगलं गेलं, तर त्याचे सादरीकरण चांगले होते. दुसरी गोष्ट म्हणजे, इथं प्रोजेक्ट बनत नाहीत, तर मराठीत चित्रपट बनतात. हिंदीत आता काही चित्रपट चांगले आहेत, पण जास्त तर असं होतं की, एक मोठा हिरो घ्या, त्यासाठी इतके करोड त्याला जातील, मग शुटिंगचे इतके, मार्केटिंग इतके करोड.. चित्रपट बनला तीनशे किंवा चारशे करडोचा, असे काही मराठीत होत नाही. प्रश्न इथून सुरू होतो की, शुटिंग कुठं करायचं, तुमचं घर मिळेल का, कथा चागली आहे, म्हटल्यावर लोक तयार होतात आणि आपले घर शुटिंगसाठी देतात. त्यामुळे चित्रपट बनवायला किती करोड लागलेत याला महत्त्व नाही, तर आम्ही काय बनवत आहोत ते महत्त्वाचं, तर हा फरक आहे.', असे ते म्हणाले.
हेही वाचा -
१. Prabhas First Look From Project K : 'प्रोजेक्ट के'मधील प्रभासचा जबरदस्त लूक पाहून चाहते दंग